लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशातील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून, परिस्थिती चिंताजनक बनली आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, तब्बल ८५% कर्जदार आपली मासिक मिळकत केवळ कर्जाचे हप्ते (ईएमआय) भरण्यासाठी खर्च करत आहेत, तरीही त्यांना आर्थिक ओझे पेलणे अशक्य होत आहे. विशेषतः ३५,००० ते ६५,००० रुपये मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांमध्ये हे संकट अधिक गडद झाले असून, त्यांचे हप्तेच २८,००० ते ५२,००० रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे गंभीर संकट निर्माण झाले आहे.
का वाढले कर्जाचे ओझे?
- नोकरकपात आणि वेतनकपात: २८% लोकांवर नोकरी जाण्यामुळे, वेतनकपातीमुळे हप्ते थकण्याची वेळ आली आहे.
- वैद्यकीय आणीबाणी: २४% अचानक आलेल्या आजारपणामुळे कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे.
- व्यवसायातील तोटा: २२% लोकांना व्यवसायातील मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे हप्ते भरणे कठीण.
- ४०% कर्जदार क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी दुसऱ्या कार्डचा आधार घेत आहेत किंवा नवीन कर्ज काढत आहेत, अशी माहिती आहे.
