Microsoft Layoffs: दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करुन मोठ्या प्रमाणात फायदा करुन घेतला आहे. एआय टूल्समुळे विक्री, कस्टमर सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर इंजिनियरिंगमध्ये उत्पादकता वाढल्याचे कंपनीचे चीफ कमर्शियल ऑफिसर जडसन अल्थॉफ यांनी सांगितले. एआयच्या मदतीने, मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षीच ५०० दशलक्ष डॉलर (सुमारे ४,२०० कोटी रुपये) पेक्षा जास्त बचत केली आहे. दुसरीकडे, मायक्रोसॉफ्टने यावर्षी १५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
मायक्रोसॉफ्टने या वर्षी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची ही तिसरी वेळ आहे. माइक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांकडून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काम करवून घेत आहे. एकीकडे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स खर्च कमी करत आहे, तर दुसरीकडे, नोकरकपातीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. आता मायक्रोसॉफ्टने उर्वरित कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. या आदेशाद्वारे, मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांना त्यांच्या एआय कौशल्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करत आहे.
कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी एआयचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्टच्या डेव्हलपर डिव्हिजनच्या अध्यक्षा ज्युलिया लिउसन यांनी अलीकडेच व्यवस्थापकांना यासंबंधी सूचना जारी केल्या. एआयचा वापर आता पर्याय राहिलेला नाही तर प्रत्येक स्तरावरील प्रत्येक भूमिकेसाठी तो महत्त्वाचा बनला आहे, असं त्यांच्या मेलमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, या वर्षी, मायक्रोसॉफ्टने चार मोठ्या कपाती केल्या आहेत. नुकतेच सुमारे ९००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर मे २०२५ मध्ये ६००० आणि जूनमध्ये शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. कंपनी प्रत्येक भूमिका आणि उपकरणात को-पायलट एआय टूल्स एकत्रित करण्याच्या धोरणावर काम करत असतानाच हे निर्णय घेण्यात आले आहेत.