Medicine Price Hike: गेल्या काही दिवसांपासून महागाई भारतीयांची पाठ सोडताना दिसत नाही. मध्यपूर्वेतील तणावामुळे आधीच सामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडले असताना आता आणखी एक धक्का सहन करावा लागणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून ताप, वेदनाशामक आणि संसर्गविरोधी (अँटीबायोटिक्स) औषधांच्या किमतीत वाढ होणार आहे. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या सूचीतील १००० हून अधिक औषधांच्या दरात वाढ करण्यास परवानगी दिली आहे.
घाऊक किंमत निर्देशांकातील बदलाच्या आधारावर ही दरवाढ केली जात असून, यामुळे औषध कंपन्यांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी रुग्णांच्या खिशाला मात्र झळ बसणार आहे.
नेमकी किती वाढ?
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकात ०.६४९५६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. याच आधारावर एनपीपीएने अत्यावश्यक औषधांच्या किमतीत सुमारे ०.६ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. दरवर्षी नियमितपणे केली जाणारी ही दरवाढ उत्पादकांचा वाढता खर्च भरून काढण्यासाठी आवश्यक असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
कोणती औषधं महागणार?
- या दरवाढीचा थेट परिणाम दररोज वापरल्या जाणाऱ्या औषधांवर होणार आहे.
- ताप व वेदनाशामक : पॅरासिटामॉल.
- अँटीबायोटिक्स : एझिथ्रोमायसिन आणि सिप्रोफ्लॉक्सासिन.
- इतर औषधे : ॲनिमिया (रक्तक्षय), जीवनसत्त्वे, मिनरल्स, स्टिरॉइड्स आणि कोविड उपचारात लागणारी महत्त्वाची औषधे.
- विशेष म्हणजे, अधिकृत वाढ ०.६ टक्के असली तरी, कच्च्या मालाच्या टंचाईमुळे बाजारपेठेत काही औषधांच्या किमतीत मोठी तफावत दिसू शकते, असा अंदाज औषध क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
दरवाढीमागचे जागतिक कारण
औषध कंपन्यांच्या मते, ही वाढ अत्यंत तुटपुंजी आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून 'एक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रिडियंट्स' आणि सॉल्व्हेंट्सच्या किमती ३० ते ३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. विशेषतः सिरपमध्ये वापरल्या जाणाऱ्या ग्लिसरीनच्या किमतीत ६४ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. तसेच पॅकेजिंगसाठी लागणारे ॲल्युमिनियम फॉइल आणि पीव्हीसी देखील ४० टक्क्यांनी महागले आहे.
ग्राहकांवर काय परिणाम?
जरी ही वाढ टक्केवारीनुसार कमी वाटत असली, तरी हजारो औषधांवर ती लागू झाल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे मासिक औषध बिल वाढणार आहे. औषध क्षेत्रातील जाणकारांच्या मते, वाढता खर्च पाहता ही दरवाढ कंपन्यांसाठी अपुरी आहे, मात्र ग्राहकांसाठी हा अतिरिक्त बोजा ठरेल.
