मॅक्डोनाल्ड्स (McDonald's) म्हणजे मॅक-डी मध्ये तुम्हीही अनेकदा बर्गर आणि अन्य काही खाद्यपदार्थ खाल्ले असतील. प्रत्येक वेळी तुम्हाला असं वाटत असेल की, हे रेस्टॉरंट फक्त त्याच्या चवीसाठी ओळखलं जातं. पण अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील एका मॅक-डी नं, एका भारतीय वंशाच्या नागरिकासाठी चक्क रेड कार्पेट अंथरून डिनरचं आयोजन केलं आणि त्याला ₹ ३५.५० लाखांचं बक्षीसदेखील दिलं. त्यांनी अचानक असं का केलं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
४० वर्षांची निष्ठेची सेवा
या सस्पेन्सवरून पडदा उठवून सांगायचं झाल्यास, ही कहाणी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील सॉगसमध्ये असलेल्या मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंटमध्ये काम करणारे भारतीय वंशाचे नागरिक परगन सिंग ऊर्फ बलबीर यांची आहे. बलबीर हे या रेस्टॉरंटमध्ये गेल्या ४० वर्षांपासून आपली सेवा देत होते. त्यांची ४० वर्षांची सेवा पूर्ण झाल्याच्या आनंदात, रेस्टॉरंटच्या मालकानं त्यांच्या सन्मानार्थ हे डिनर आयोजित केलं आणि त्यांना ४० हजार डॉलर्सचा (सुमारे ₹ ३५.५० लाख) चेक देखील दिला.
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
परगन बनले कुटुंबाचा भाग
परगन ऊर्फ बलबीर पहिल्यांदा आपल्या वडिलांसोबत मॅक-डीच्या रेस्टॉरंटमध्ये काम करायला पोहोचले, तेव्हा पुढील ४० वर्षे याच ठिकाणी सेवा देतील, याची त्यांना स्वतःलाही कल्पना नव्हती. त्यांच्या सन्मानार्थ जेव्हा डिनरचं आयोजन करण्यात आलं, तेव्हा रेस्टॉरंटच्या मालक ते सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना कुटुंबाचा भाग असल्याचं सांगितलं. रेस्टॉरंटच्या मालक लिंडसे वॉलिन (Lindsay Wallin) यांचं म्हणणं आहे की, सुरुवातीला परगन त्यांच्या वडिलांसोबत काम करायला आले होते आणि हळूहळू ते या कुटुंबाचा भाग बनले.
प्लेट उचलण्यापासून ते मॅनेजरपर्यंतचा प्रवास
बलबीर यांनी या रेस्टॉरंटमध्ये अगदी सुरुवातीपासून काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी खुर्च्या आणि टेबल्स साफ करण्यापासून आणि कचरा उचलण्यापासून आपल्या सेवेची सुरुवात केली. स्वयंपाकघरात मदत केली आणि हळूहळू काम शिकून फ्रंट डेस्कपर्यंत पोहोचले. त्यांच्या कामामुळे खूश होऊन ३-४ महिन्यांनंतरच त्यांना स्विंग मॅनेजर बनवण्यात आलं. रेस्टॉरंटच्या मालकाचं म्हणणं आहे की, त्यांच्याकडे सध्या ४ ठिकाणी मॅक-डी रेस्टॉरंट आहेत आणि बलबीर हे त्याचे मजबूत स्तंभ आहेत. बलबीर यांना कामावर ठेवल्याबद्दल आणि त्यांना आपल्यासोबत जोडून ठेवल्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे.
समर्पणामुळे बनले सगळ्यांचे लाडके
लिंडसे म्हणाल्या की, सर्व कर्मचारी बलबीर यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांना 'पापा बिअर' (Papa Bear) या नावानं हाक मारतात. ते खूप आनंदी व्यक्ती आहेत आणि आपल्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित आहेत. त्यांच्यासाठी सन्मानाचं आयोजन करणं, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. "आपल्यासाठी येथे काम करणं म्हणजे एका कुटुंबासोबत राहण्यासारखं आहे आणि म्हणूनच ते ४० वर्षे एकाच ठिकाणी काम करू शकले," अशी प्रतिक्रिया बलबीर यांनी दिली.
