Oracle Layoff: जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलनं भारतातील हजारो कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कामावरून काढून टाकलंय. रिपोर्ट्सनुसार, कंपनीनं भारतातील सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर, कंपनीचे उच्च अधिकारी परतल्यावर हे पाऊल उचलण्यात आलंय. भारतातील बंगळुरू, हैदराबाद, पुणे, मुंबई, नोएडा, कोलकाता आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये ओरॅकलचं मोठं नेटवर्क आहे, जिथे हजारो लोक काम करतात.
गेल्या वर्षीपर्यंत, ओरॅकलचे भारतात सुमारे २८,८२४ कर्मचारी होते. आता यातील हजारो कर्मचाऱ्यांना एकाच वेळी काढून टाकण्यात आलंय. या कपातीच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकेत रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी भारतात नोकऱ्या कमी केल्या जात आहेत असं अनेक जण मानत आहेत. दरम्यान, या कपातीबद्दल ओरॅकलनं अद्याप कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही, ज्यामुळे संशय आणि अटकळांना आणखी बळकटी मिळाली आहे.
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
मालकाला जोरदार झटका
ओरॅकलमधील कर्मचारी कपातीच्या बातमीनंतर कंपनीला शेअर बाजारातही झटका बसला. मंगळवारी कंपनीचे शेअर्स सुमारे ६% नं घसरले. याचा सर्वात मोठा परिणाम कंपनीचे मालक लॅरी एलिसन यांच्यावर झाला. एकाच दिवसात त्यांना सुमारे १५ अब्ज डॉलर्स म्हणजेच ₹ १.३१ लाख कोटींचं नुकसान झालं. एलिसन यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. त्यांच्याकडे ओरेकल कंपनीचे ४० टक्क्यांहून अधिक शेअर्स आहेत.
कोण आहेत लॅरी एलिसन?
लॅरी एलिसन हे ओरेकल कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी सुमारे ३७ वर्षे कंपनीचे सीईओ म्हणून काम केलंय. २०१४ मध्ये त्यांनी सीईओ पद सोडलं, परंतु ते अजूनही कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) आहेत. गेल्या महिन्यात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मोठा बदल दिसून आला. मेटा प्लॅटफॉर्मचे प्रमुख मार्क झुकरबर्ग तिसऱ्या स्थानावर आले, तर ओरॅकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांनी दुसऱ्या स्थानावर मोठी झेप घेतली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एलिसन यांची एकूण संपत्ती २५१ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती.
लॅरी यांच्यामुळे, ओरॅकलनं अलिकडच्या काही महिन्यांत क्लाउड कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सचे मोठे करार देखील मिळवले आहेत. कंपनी डेटा सेंटर बांधण्यावर देखील लक्ष केंद्रित करत आहे, जे ओपनएआय सारख्या कंपन्यांना सेवा प्रदान करतील. गेल्या तिमाहीत ओरॅकलची कमाई अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती. २०२६ च्या आर्थिक वर्षात कंपनी आणखी चांगली कामगिरी करेल, असं कंपनीच्या सीईओंनी म्हटलंय. ओरॅकलनं अनेक मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी देखील केली आहे.