प्रसाद गो. जोशी
भारत आणि अमेरिकेदरम्यान होऊ घातलेला व्यापार करार व त्याच्याशी संबंधित बाबींकडे बाजाराची बारीक नजर आहे. त्याचबरोबर या सप्ताहामध्ये महत्त्वाच्या कंपन्यांच्या तिमाही निकालांची घोषणा होणार आहे. त्याकडे लक्ष ठेवून बाजाराची वाटचाल राहणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये होणाऱ्या हालचालींवरही बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार आहे. जागतिक पातळीवर भारत आणि अमेरिकेदरम्यान होणाऱ्या व्यापार कराराकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या करारातील तरतुदी बघून परकीय वित्तसंस्था आपले धोरण ठरविण्याची शक्यता आहे. करार लाभदायक वाटल्यास परकीय वित्तसंस्था भारतामधील आपली गुंतवणूक वाढवू शकतात. म्हणून या कराराकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतातील सर्वांत मोठ्या कंपनीने चांगला नफा कमावला आहे. त्याचे प्रतिबिंब सोमवारी बाजारामध्ये पडण्याची शक्यता आहे.
परकीय वित्तसंस्थांनी काढले ५,५२४ कोटी रुपये
शेअर बाजारामधून परकीय वित्तसंस्थांनी जुलै महिन्याच्या पहिल्या तीन सप्ताहांमध्ये ५५२४ कोटी रुपये काढून घेतले आहेत. व्यापार करार आणि कमी आलेले तिमाही निकाल यामुळे पैसे काढले गेले. याआधीच्या तीन महिन्यांमध्ये परकीय वित्तसंस्थांनी केवळ खरेदीच केल्याचे दिसून आले होते. देशांतर्गत वित्तसंस्था या आधीपासूनच भारतीय शेअर बाजारामधून खरेदी करताना दिसून येत आहेत.
भारतीय कंपन्यांचे बाजाराला अपेक्षित असलेले तिमाही निकाल काहीसे उच्च होते. मात्र, या कंपन्यांची कामगिरी तशी न झाल्याने परकीय वित्तसंस्थांनी सावध भूमिका घेतली आहे.