लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी या देशातील महिलांचा विकास होणे आवश्यक आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ३३ हजार मुलींना शिष्यवृत्ती देऊन महिलांना सक्षम बनविण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे, असे मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. ही शिष्यवृत्ती मलाबार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
दागिन्यांच्या क्षेत्रातील जगातील पाचवा सर्वांत मोठा समूह मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने २०२६-२७ मध्ये सीएसआर फंडातून २०० कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली आहे.
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते मुलींना शिष्यवृत्ती वितरणाचा शुभारंभ
करण्यात आला.
मलाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद म्हणाले की, दर्जेदार शिक्षणाद्वारे सुप्त गुणांना वाव देण्याची गरज आहे. ही शिष्यवृत्ती योजना ३३ हजार विद्यार्थ्यांना यश संपादन करून सक्षम बनविणार आहे. २२ राज्यांमध्ये मायक्रो-लर्निंग सेंटर्स, ग्रँडमा होम आणि हंगर फ्री वर्ल्ड यावर निधी खर्च केला जाणार आहे.
पीयूष गोयल यांनी केला ‘लोकमत’चा उल्लेख
मलाबार समूह जाती-धर्माचा विचार न करता सामाजिक कार्य करीत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत लोकमत मीडिया हाउसने 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२६'मध्ये मलाबार ग्रुपचे चेअरमन एम. पी. अहमद यांचा 'बिझनेस भूषण' पुरस्कार देऊन नुकताच गौरव केला. हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला, असा उल्लेख वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी आवर्जून केला.
मलाबारचे अन्य कंपन्यांनी अनुकरण करावे
गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा विडा उचलला आहे. मात्र, जोपर्यंत प्रत्येक महिला सक्षम होत नाही, तोपर्यंत या लक्ष्यची प्राप्ती अशक्य आहे. कायद्यानुसार दोन टक्क्याचे बंधन असूनही मलाबार समूहाने नफ्यातील पाच टक्के रक्कम सामाजिक कार्यावर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे अन्य कंपन्यांनीसुद्धा अनुकरण करायला पाहिजे, असे गोयल म्हणाले.
