Mahila Samman Savings Certificate : राज्यात लाडकी बहीण योजना हिट ठरल्याचे पाहायला मिळाले. या योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याबद्दल अधिकृत माहिती नाही. योजनेचे निकष बदलणार अशी देखील चर्चा ऐकायला मिळत आहे. पण, केंद्र सरकारच्या एका योजनेचा सर्व महिला लाभ घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी २०२३ मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) सुरू केली. या योजनेला देखील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत या योजनेअंतर्गत ४३,३०,१२१ खाती उघडण्यात आली आहेत.
एमएसएससी योजनेची काही खास वैशिष्ट्ये
योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी किमान रक्कम १००० रुपये आणि कमाल २ लाख रुपये आहे. त्याचा कालावधी २ वर्षांचा आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक ७.५ टक्के परतावा मिळतो, जो दर ३ महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा होतो. एमएसएससी योजनेत कोणतीही महिला स्वतःचे खाते उघडू शकते. मुलगी अल्पवयीन असेल तर कुटुंबातील सदस्य किंवा मुलीचे पालक तिच्या नावावर खाते उघडू शकतात. या योजनेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ आहे.
एमएसएससी योजनेतून पैसे कसे काढायचे?
तुम्ही खाते उघडल्यानंतर ६ महिन्यांनंतर तुमचे पैसेही काढू शकता. याआधी, खातेदाराचा मृत्यू झाल्यास किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा हवाला देऊन खात्यातून पैसे काढता येतात. सहसा, २ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह संपूर्ण रक्कम खात्यात जमा केली जाते.
खाते उघडण्यासाठी काय करावे लागते?
MSSC साठी खाते उघडणे देखील खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खाते उघडण्याचा फॉर्म भरावा लागेल आणि आधार, पॅन कार्ड सारखी कागदपत्रे जमा करावी लागतील. तुम्ही या योजनेसाठी प्रत्येक बँकेत खाते उघडू शकत नाही. यासाठी निवडलेल्या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, PAB आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.