L&T chairman : कामाचे तास किती असावेत यावरुन भारतात सोशल वॉर सुरू झालं आहे. गेल्या डिसेंबरमध्ये इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांनी आठवण्यात ७० तास काम केले पाहिजे, असा सल्ला दिला होता. यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. वर्क लाइफ बॅलन्स हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. हा वाद क्षमत नाही तोच एल अँड टी कंपनीचे चेअरमन यांनी अकलेचे तारे तोडले आणि थेट ९० तास काम करण्याचा सल्ला दिला. यावरुन त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका होत आहे. दरम्यान, कंपनीने आता या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबत एसएन सुब्रमण्यम यांचा दूरदर्षी लीडर असल्याचाही उल्लेख केला आहे.
लार्सन अँड टुब्रो (L&T) च्या एचआर प्रमुखाने या विषयावर आपले मत व्यक्त केले. वास्तविक, सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर चौफेक टीका होत आहे. एवढेच काय पण व्यापारी जगतातील मोठ्या व्यक्तींनीही यावर तोंडसुख घेतलं. एचआर प्रमुख सोनिका यांनी स्पष्ट केले की, हे वक्तव्य अंतर्गत चर्चा सुरू असताना केलं होतं. प्रत्यक्षात चेअरमन यांनी आठवड्यातून ९० तास काम करावे असं बंधनकारक केले नाही किंवा तसे सुचवले नाही. अशा कोणत्याही सूचना लादण्याचा त्यांचा हेतू नव्हता.
एल अँड टीचे अध्यक्ष दूरदर्शी नेता
गेल्या ५ वर्षांपासून L&T मध्ये ते कार्यरत असलेल्या सोनिका पुढे म्हणाल्या, की चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम हे एक दूरदर्शी नेतृत्व आहे. ते आपल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा भाग मानतात. त्यांचे हे वर्तन संघटनेतील एकतेची आणि सुरक्षेची भावना वाढवते.
अध्यक्ष नियमितपणे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कर्मचाऱ्यांशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या ऐकून घेतात. काही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. वास्तविक, कंपनीतील एका बैठकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या वादाला तोंड फुटले. व्हिडिओमध्ये एसएन सुब्रमण्यम यांनी रविवारी कर्मचाऱ्यांकडून काम करून न घेतल्याबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी बोलताना, घरी बायकोच्या तोंडाकडे किती वेळ पाहणार? अशी टिपण्णी देखील केली होती. कर्मचाऱ्यांना जगात अव्वल स्थान मिळवायचे असेल तर त्यांना आठवड्यातून ९० तास काम करावे लागेल, असेही ते म्हणाले. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होऊ लागली.