लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली ‘जेन-झी’ पिढी आता पारंपरिक, कायमस्वरूपी नोकऱ्यांपेक्षा उच्च वेतन, लवचिक काम, वैयक्तिक जीवनातील समतोल आणि उद्देश यांना अधिक प्राधान्य देत आहे. ‘रँडस्टॅड इंडिया’च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार, ही पिढी फक्त पगारावर लक्ष केंद्रित करत नाही, तर कामातील अर्थ, शिकण्याच्या संधी आणि स्वातंत्र्यपूर्ण कामकाजाचे वातावरण शोधते आहे. त्यांना पारंपरिक फायद्यांपेक्षा विदेशात दूरस्थपणे (रिमोट) काम करण्याच्या आणि प्रवासाच्या संधी अधिक आकर्षित करत आहेत. ३७ % भारतीय ‘जेन-झी’ कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते पुढील एका वर्षात नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत. म्हणजेच, भारतीय तरुणांकडे स्थिरतेपेक्षा बदलाची मानसिकता अधिक आहे.
जेन-झीला काय हवेय?
या पिढीसाठी कामाचे तास लवचिक असणे, अतिरिक्त सुटी आणि मानसिक आरोग्याचा विचार हे घटक अत्यावश्यक झाले आहेत. ज्या कंपन्या आजीवन शिक्षण, सर्वसमावेशक संस्कृती आणि लवचिक धोरणे स्वीकारत आहेत, त्यांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे.
फुल-टाइम नोकरीसोबत साइड वर्क
भारतातील अनेक जेन-झींना फुल-टाइम नोकरीसोबत साइड वर्क करणे पसंत आहे. या प्रवृत्तीला सकारात्मकपणे स्वीकारणाऱ्या कंपन्यांनाच नव्या पिढीतील सर्वोत्तम प्रतिभा मिळतील, असे अहवालात म्हटले आहे.
नोकऱ्यांचे प्रमाण घटले
नोकरी - बाजारातील बदल
घटक बदल (%)
- प्रवेशस्तर (०–२ वर्ष अनुभव) - २९%
- टेक्नॉलॉजी क्षेत्र - ३५%
- फायनान्स क्षेत्र - २४%
- हेल्थकेअर क्षेत्र - १३%
नोकरीला रामराम का?
जेन-झी कमी वेतन आणि कंपनीतील कार्यसंस्कृतीमुळे नोकरी सोडत आहेत. ५०% युवक कमी वेतनामुळे एका वर्षात नोकरी सोडतात. संस्थेच्या मूल्यांशी विसंगती आणि नकारात्मक कामाचे वातावरण ही मोठी कारणे आहेत.
