LIC New Jeevan Shanti : निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिक विवंचनेशिवाय जगता यावे, यासाठी प्रत्येकाला एका खात्रीशीर पेन्शन योजनेची गरज असते. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमची 'न्यू जीवन शांती' ही योजना सध्या गुंतवणूकदारांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला केवळ एकदाच गुंतवणूक करायची असून, त्या बदल्यात आयुष्यभर पेन्शनची हमी मिळते.
काय आहे एलआयसी 'न्यू जीवन शांती' प्लॅन?
ही एक 'सिंगल प्रीमियम डिफर्ड अॅन्युइटी' योजना आहे. म्हणजेच, यामध्ये तुम्हाला विमा घेतानाच एकरकमी मोठी रक्कम गुंतवावी लागते आणि त्या बदल्यात भविष्यात किती पेन्शन मिळेल, हे आधीच निश्चित केले जाते. यात किमान गुंतवणूक १.५ लाख रुपये आहे. तर कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही उच्च मर्यादा नाही. तुम्ही जेवढी जास्त रक्कम गुंतवाल, तेवढी जास्त पेन्शन मिळेल.
गुंतवणुकीचे दोन मुख्य पर्याय
सिंगल लाईफ : यामध्ये एका व्यक्तीला आयुष्यभर पेन्शन मिळते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, जमा केलेली मूळ रक्कम वारसाला दिली जाते.
जॉइंट लाईफ : यामध्ये पती-पत्नी दोघेही समाविष्ट होऊ शकतात. एकाच्या मृत्यूनंतर दुसऱ्याला पेन्शन सुरू राहते आणि दोघांच्या मृत्यूनंतर सर्व रक्कम वारसाला मिळते.
५ वर्षांचा लॉक-इन आणि परतावा
या योजनेसाठी ५ वर्षांचा लॉक-इन पिरीयड आहे. म्हणजेच तुम्ही एकदा रक्कम गुंतवल्यानंतर ती पाच वर्षांसाठी ब्लॉक होते आणि त्यानंतर पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. या योजनेसाठी वयोमर्यादा ३० ते ७९ वर्षे दरम्यान आहे. विशेष म्हणजे, गरज भासल्यास तुम्ही ही पॉलिसी कधीही सरेंडर करू शकता.
वार्षिक १ लाख पेन्शन कशी मिळवाल?
समजा, ५५ वर्षांच्या एखाद्या व्यक्तीने या योजनेत ११ लाख रुपये एकरकमी गुंतवले आणि ५ वर्षांचा डिफर्ड कालावधी निवडला, तर त्यांना मिळणारा परतावा खालीलप्रमाणे असेल.
- वार्षिक पेन्शन : १,०१,८८० रुपये (सुमारे १.०२ लाख)
- सहामाही पेन्शन : ४९,९११ रुपये
- मासिक पेन्शन : ८,१४९ रुपये
- (टीप: गुंतवणुकीची रक्कम आणि वयानुसार पेन्शनच्या रकमेत बदल होऊ शकतो.)
योजनेचे अतिरिक्त फायदे
- पेन्शनची लवचिकता : तुम्ही तुमची पेन्शन मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक अशा कोणत्याही स्वरूपात घेऊ शकता.
- सुरक्षितता : ही सरकारी कंपनीची योजना असल्याने तुमच्या भांडवलाची पूर्ण सुरक्षा असते.
- कर्ज सुविधा : या पॉलिसीवर तुम्ही गरजेच्या वेळी कर्ज देखील घेऊ शकता.
