देशातील टॉप श्रीमंतांपैकी एक असलेले स्टील व्यावसायिक लक्ष्मी मित्तल यांच्याशी संबंधित एका कंपनीनं दिल्लीतील ल्युटियन्स परिसरात एक मोठी मालमत्ता खरेदी केली आहे. मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टनुसार, या कंपनीनं ३१० कोटी रुपयांमध्ये एक बंगला खरेदी केलाय. दिल्लीच्या प्रॉपर्टी सर्कलमध्ये या वर्षातील हा सर्वात मोठा करार मानला जात आहे. लक्ष्मी मित्तल हे आर्सेलर मित्तलचे चेअरमन आहेत. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार, लक्ष्मी मित्तल यांची एकूण संपत्ती (Networth) २६.९ अब्ज डॉलर आहे.
रिपोर्टनुसार, मुंबईतील 'जेंटेक्स मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड' नावाच्या कंपनीनं दिल्लीत हा बंगला खरेदी केला आहे. ३,५४० चौरस यार्ड मध्ये पसरलेला हा बंगला ए.पी.जे. अब्दुल कलाम रोडवर आहे, ज्याला पूर्वी औरंगजेब रोड म्हणून ओळखलं जात होतं. नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, हा करार याच वर्षी जूनमध्ये नोंदणीकृत झाला असून, यासाठी खरेदीदारानं २१.७० कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरली आहे. प्रति चौरस यार्डनुसार पाहिलं तर, या बंगल्याची किंमत ८.७५ लाख रुपये प्रति चौरस यार्ड इतकी होते.
लक्ष्मी मित्तल यांची नेटवर्थ
१९३० मध्ये बांधलेल्या या बंगल्याचा संबंध अलवरच्या शाही कुटुंबाशी आहे. जेंटेक्स मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांमध्ये (Directors) सूर्य कुमार कनोडिया यांचाही समावेश आहे. जेंटेक्स मर्चंट्स आणि लक्ष्मी मित्तल यांनी याबद्दल कोणतीही टिप्पणी केलेली नाही. लक्ष्मी मित्तल यांच्याकडे यापूर्वीच ल्युटियन्स दिल्लीमध्ये पृथ्वीराज रोडवर एक बंगला आहे. जाणकारांचं म्हणणं आहे की, या करारामुळे हे स्पष्ट होते की दिल्लीतील ल्युटियन्समध्ये मोठ्या बंगल्यांची मागणी अजूनही कायम आहे. येथे अनेक मोठे उद्योगपती आणि जागतिक व्यावसायिक कुटुंबांनी मालमत्ता खरेदी केल्यात.
लक्ष्मी मित्तल हे भारतीय श्रीमंतांच्या यादीत सातव्या आणि जगात ८२ व्या क्रमांकावर आहेत. यावर्षी त्यांच्या नेटवर्थमध्ये ७.२६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. आर्सेलर मित्तलचे मुख्यालय लक्झेंबर्ग येथे असून, त्यांचा व्यवसाय १५ देशांमध्ये पसरलेला आहे. गेल्या वर्षी त्यांचा महसूल ६२.४ अब्ज डॉलर होता. मित्तल लंडनमध्ये राहतात, जिथे त्यांच्या अनेक मालमत्ता आहेत.