अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी नुकतेच अमेरिकन फेडरल सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे साप्ताहिक रिपोर्ट कार्ड पाठविण्याचे आदेश दिले आहेत. याची कॉपी ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी केली आहे. आपल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा तपशील देणारा साप्ताहिक अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
कर्मचाऱ्यांना मेमो
भाविश अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना मेमो पाठवला आहे, त्याचं नाव आहे 'क्या चल रहा है?' असं आहे. या नव्या उपक्रमांतर्गत ओला कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला ३-५ बुलेट पॉईंटचे काम पूर्ण करून ईमेल पाठवावा लागणारे. भाविश यांच्या मेमोनुसार, हे रिपोर्ट कर्मचाऱ्यांनी अपवाद वगळता व्यवस्थापक आणि कंपनीच्या ईमेल आयडीवर सादर करणं आवश्यक आहे.
पाठवला अंतर्गत ईमेल
कर्मचाऱ्यांना एक अंतर्गत ईमेल पाठवण्यात आला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना वीकली अपडेट आणि आपल्यासोबत आणि व्यवस्थापकांसोबत शेअर करण्यास सांगितलं आहे. आपल्या मॅनेजरला आणि Kyachalrahahai@olagroup.in (एका तासात ईमेल अॅक्टिव्हेट होईल) वर गेल्या आठवड्यात केलेल्या कामाबद्दल ३-५ बुलेट पॉईंट्ससह संक्षिप्त अपडेट पाठवा असंही ईमेलमध्ये म्हटलंय.
महत्त्वाचे बदलांतून जातेय कंपनी
हे निर्देश अशा वेळी देण्यात आले आहेत जेव्हा ओला अनेक महत्त्वपूर्ण बदलांमधून जात आहे, ज्यात खर्चात कपात करणं आणि नफा कमविण्याच्या उद्देशानं छंटणीच्या फेरीचा समावेश आहे. कंपनीची इलेक्ट्रिक वाहन कंपनी 'ओला इलेक्ट्रिक' १,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे.
कोणत्या विभागांना होणार फटका
ओला आपलं कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असल्यानं खरेदी, ग्राहक संबंध आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसह विविध विभागांवर या कपातीचा परिणाम होणार आहे. अग्रवाल यांचा नवीन रिपोर्टिंग उपक्रम मस्क यांनी सादर केलेल्या धोरणाची आठवण करून देत आहे, ज्यांनी अलीकडेच अमेरिकन फेडरल कर्मचाऱ्यांना बुलेट पॉईंटमध्ये साप्ताहिक कामगिरी अहवाल सादर करणं बंधनकारक केलं आहे. सरकारी कार्यक्षमता विभागात (DOGI) काम करताना उत्तरदायित्व सुधारण्यासाठी आणि सरकारी कामातील अकार्यक्षमता कमी करण्यासाठी मस्क यांचं धोरण सुरू करण्यात आलं होतं.