कोटक महिंद्रा बँक आणि फेडरल बँक भारतातील डॉईश बँकेचा रिटेल आणि वेल्थ बिझनेस आपल्याकडे घेण्यासाठी स्पर्धा करत आहेत. इकॉनॉमिक टाईम्समधील एका वृत्तानुसार, जर्मन बँक युरोपबाहेरील त्यांच्या एकमेव किरकोळ बाजारपेठ असलेल्या या विभागातून बाहेर पडण्याची योजना आखत आहे. देशातील हा व्यवसाय विकण्याचा जर्मन बँकेचा आठ वर्षांत दुसरा प्रयत्न आहे.
हा करार काय आहे?
या करारात वैयक्तिक कर्जे, गृहकर्जे आणि संपत्ती व्यवस्थापन मालमत्तांचा समावेश आहे. भारतीय किरकोळ युनिटनं आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ₹२,४५५ कोटींचा महसूल निर्माण केला, जो मागील वर्षाच्या तुलनेत ४% जास्त आहे. मार्च २०२५ पर्यंत, बँकेची किरकोळ मालमत्ता ₹२५,०३८ कोटी होती. दोन्ही भारतीय बँकांनी पोर्टफोलिओचं मूल्यांकन केले आहे आणि आता मूल्यांकन आणि इतर अटींवर वाटाघाटी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या करारामुळे दोन्ही बँकांना डॉईश बँकेच्या संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मजबूत उपस्थिती मिळू शकते, जी त्यांच्या विस्तार योजनांनुसार आहे.
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
बँकांनी काय म्हटलं?
डॉईश बँक, कोटक महिंद्रा बँक आणि फेडरल बँकेनं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे पाऊल डॉईश बँकेचे सीईओ ख्रिश्चन सेव्हिंग यांच्या जागतिक पुनर्रचना योजनेचा भाग असल्याचे मानलं जातंय. २०२८ पर्यंत महसूल €३७ बिलियनपर्यंत वाढवण्याचे आणि रिटर्न ऑन टॅन्जिबल इक्विटीवरील परतावा १३% पेक्षा जास्त करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. जर हा करार यशस्वी झाला तर डॉईश बँक भारतातील तिच्या १७ रिटेल शाखा बंद करू शकते. या हालचालीमुळे २०२२ मध्ये सिटी बँकेचा भारतीय रिटेल व्यवसाय अॅक्सिस बँकेला विकणं यासारखं मोठं एक्झिट दिसून येईल. यापूर्वी, २०११ मध्ये डॉईशनं आपला क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओ इंडसइंड बँकेला विकला.
