Uday Kotak News: देशातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या कोटक बँकेच्या संस्थापकांनी मुंबईतील वरळी सी फेस येथील एक संपूर्ण इमारत खरेदी केली आहे. त्यासाठी त्यांनी ४०० कोटींहून अधिक खर्च केलाय. यापूर्वी कोटक कुटुंबीयांनी जानेवारी आणि सप्टेंबरमध्ये या इमारतीतील २४ पैकी १३ फ्लॅट खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी प्रति चौरस फूट सुमारे २ लाख ७२ हजार रुपये भरले. आता उर्वरित ८ फ्लॅट त्यांनी विकत घेतले आहेत. यावेळी त्यांनी प्रति चौरस फूट २.७५ लाख रुपये भरले आहेत. हा एक नवा विक्रम आहे.
ईटीनं दिलेल्या वृत्तानुसार, हे नवे व्यवहार ८ एप्रिल आणि २१ एप्रिल रोजी झाल्याचं कागदपत्रांवरून समोर आलं आहे. या अपार्टमेंटची किंमत १२ कोटी रुपयांपासून २७.५९ कोटी रुपयांपर्यंत आहे. हे अपार्टमेंट्स ४४४ चौरस फूट ते १००४ चौरस फुटांपर्यंत आहेत. या आठ व्यवहारांची एकूण किंमत १३१.५५ कोटी रुपये आहे. ४०० कोटींहून अधिक खर्च करून या संपूर्ण इमारतीचा व्यवहार झालाय. या इमारतीतील सर्वात मोठा फ्लॅट १,३९६ चौरस फुटांचा आहे. तो ३८.२४ कोटी रुपयांना विकला गेलाय. सर्वात लहान फ्लॅट १७३ चौरस फुटांचा आहे. त्याची ४.७ कोटींपेक्षा जास्त किंमतीत विक्री झालीये.
दक्षिण मुंबईत सर्वाधिक दर
कोटक यांच्या जानेवारीतील व्यवहारापूर्वी देशात सर्वाधिक दर दक्षिण मुंबईतील अल्टामाऊंट रोड आणि भुलाभाई देसाई रोड येथे होते. २.२५ लाख आणि २.०९ लाख रुपये दर होते. १९ शिवसागर असं या भव्य इमारतीचं नाव असून ती शॅम्पेन हाऊसच्या शेजारी आहे. कोटक कुटुंबाने २०१८ मध्ये रणजित चौगुले यांच्याकडून ३८५ कोटी रुपयांना शॅम्पेन हाऊस खरेदी केलं होतं. रणजित चौगुले हे इंडेज विंटनर्स नावाच्या वाईन कंपनीचे मालक होते. शॅम्पेन हाऊस आता कोटक कुटुंबाचे नवं घर म्हणून विकसित केलं जात आहे.
कोटक कुटुंबीय हे दोन्ही भूखंड एकत्र करून मोठा प्रकल्प उभारणार की वेगळे ठेवणार, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मुंबई हे देशातील सर्वात मोठे आणि महागडे रिअल इस्टेट मार्केट आहे. येथील मालमत्तांच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. एप्रिल महिन्यात येथे सर्वाधिक प्रॉपर्टी डील झाल्या आहेत.