पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक
या वर्षी प्रथमच ट्रेडिंग सेशन दुपारच्या वेळेत दिवाळीदरम्यान सर्व व्यावसायिक समुदायासाठी धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजन हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. हिंदू धर्मानुसार या दोन दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
लक्ष्मी हे धनाचे, वैभवाचे, संपत्तीचे, आर्थिक स्थैर्याचे रूप आणि देवता आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्ताच्या वेळी या विशेष ट्रेडिंग कालावधीत खरेदी केल्यास त्याची सकारात्मक अनुभूती येणाऱ्या काळात मिळेल अशी आशा गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स बाळगून असतात. म्हणूनच ‘मुहूर्त ट्रेड’ला व्यवहाराबरोबरच भावनिक व धार्मिक दृष्टीनेही महत्त्व आहे.
चोपडी पूजन
धनत्रयोदशीच्या दिवशी व्यावसायिक चोपडी किंवा चोपडा पूजन करतात. धन्वंतरी जयंती असल्याने याच दिवशी धन्वंतरी म्हणजेच आरोग्याची देवता हिचेही पूजन केले जाते. यामागे प्रमुख उद्देश येणाऱ्या वर्षभरात व्यवसाय, धन आणि आरोग्य यांची सुबत्ता नांदो. व्यवसायाच्या दृष्टीने याच दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. म्हणून चोपडी म्हणजेच ज्यात व्यवसायाच्या नोंदी असतात त्याचे पूजन उत्तम मुहूर्तावर केले जाते.
मुहूर्त ट्रेडिंग
मुहूर्त याचाच अर्थ उत्तम काळ. पंचांगानुसार मुहूर्ताच्या वेळी जे काम किंवा कर्म केले जाते त्याचे फळ उत्तम मिळते, असे मानले जाते. शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांच्या दृष्टीने लक्ष्मी पूजन हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मनाला जातो.
खरेतर, महत्त्वाच्या सणांच्या दिवशी शेअर बाजारास सुट्टी असते; परंतु, दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विशिष्ट कालावधीसाठी बाजार सुरू केला जातो यालाच ‘मुहूर्त ट्रेड’ असे म्हणतात.
साधारणतः या दिवाळीपासून पुढील दिवाळी किंवा आगामी काही वर्षांत जे जे शेअर्स वधारतील असा अभ्यासपूर्ण अंदाज बांधला जातो, असे उत्तम कंपन्यांचे शेअर्स या मुहूर्त ट्रेडिंग काळात गुंतवणूकदार खरेदी करतात.
मुहूर्त ट्रेडिंग काळात शेअर बाजारात गुंतवणूकदारांना खरेदीचे विकल्प.
१. उत्तम कंपन्यांचे शेअर्स
२. म्युच्युअल फंडमधील एसआयपी किंवा एकरकमी गुंतवणूक
३. विविध प्रकारांतील ईटीएफ (एक्सचेंज ट्रेड फंड)
मुहूर्ताच्या ट्रेडिंगची वेळ
लक्ष्मी पूजन : मंगळवार, २१ ऑक्टोबर
प्री ओपन सेशन : दुपारी १:३० ते १:४५
ट्रेडिंग वेळ : दुपारी १:४५ ते २:४५
दरवर्षी मुहूर्त ट्रेडिंगची वेळ सायंकाळी असते. परंतु, प्रथमच या वर्षी ही वेळ दुपारची ठरवली गेली आहे. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांनी या बदलाची नोंद अवश्य घ्यावी.
