प्रसाद गो. जोशी
भारतीय रिझर्व्ह बँकेनेरेपो दरामध्ये घट केल्याने कर्जावरील व्याजदर घटणार आहेत. त्याचा फायदा बँकांना झाल्यामुळे त्यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्याबाबत सजग राहिले पाहिजे. याशिवाय या सप्ताहात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांची घोषणा होणार आहे. त्याकडेही बाजाराचे लक्ष लागून आहे. परकीय वित्त संस्थांकडून होणारे व्यवहार आणि डॉलरचे मूल्य याबाबीही बाजारावर परिणाम करू शकतात. रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये घट केल्यामुळे कर्जे स्वस्त होणार आहेत. त्याचा परिणाम बँकांच्या शेअरच्या किमतींवर होईल.
गतसप्ताहामध्ये शेअर बाजारात चढउतार झाले आहेत. याचाच अर्थ बाजार अमेरिकेतील व्याजदरांच्या घोेषणेची वाट बघत आहे. या आठवडयात चढउतार अपेक्षित.
भारतातून पैसे काढून घेण्याचे प्रमाण वाढतेच
दोन महिन्यांपासून विक्रीच्या पवित्र्यात असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या सप्ताहातही विक्री कायम ठेवली आहे.
भारतीय रुपयाच्या घटत्या मूल्यामुळे या संस्थांनी सावधपणे व्यवहार केले आहेत. डिसेंबर महिन्याच्या ५ दिवसांमध्ये या संस्थांनी बाजारातून ११,८२० कोटी रुपये काढून घेतले आहेत.
याआधी नोव्हेंबर मध्ये ३७६५ कोटी,सप्टेंबरमध्ये २३,८८५ कोटी, ऑगस्टमध्ये ३४,९९० कोटी तर जुलैमध्ये १७७०० कोटी रुपये बाजारातून काढून घेतले होते.
