Job Opportunities in Russia : आतापर्यंत आखाती देशांकडे वळणारे भारतीय कामगार आता रशियाच्या बाजारपेठेकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. युक्रेनसोबत सुरू असलेले प्रदीर्घ युद्ध आणि देशातील घटत्या तरुण लोकसंख्येमुळे रशियामध्ये सध्या कामगारांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, कन्स्ट्रक्शनपासून ते तेल-गॅस रिफायनरीपर्यंत अनेक क्षेत्रांत रशियाला 'भारतीय हातांची' गरज भासत असून, गेल्या चार वर्षांत रशियात जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पगाराचे आकर्षक पॅकेज आणि सुविधा
- एका सामान्य मजुराचा सुरुवातीचा पगार किमान ५०,००० रुपये प्रति महिना आहे.
- ओव्हरटाइम आणि अनुभवासह हे उत्पन्न १.५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
- आयटी किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञांना १.८ लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळत आहे.
- खाणी, रिफायनरी आणि ऑईलफिल्ड्समध्ये काम करणाऱ्यांना अनेक कंपन्या राहणे आणि जेवण मोफत देतात, ज्यामुळे मोठी बचत शक्य आहे.
कोणत्या कामांना आहे सर्वाधिक मागणी?
रशियामध्ये सध्या 'ब्लू-कॉलर' जॉब्ससाठी मोठी भरती सुरू आहे. प्रामुख्याने वेल्डर, सुतार, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर आणि फॅक्टरी ऑपरेटर या कामांसाठी भारतीय कामगारांना अधिक पसंती दिली जात आहे. विशेषतः पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधून लोक रशियाकडे वळत आहेत.
रशियाला भारतीयांची गरज का?
रशियाची लोकसंख्या वेगाने वृद्ध होत असून काम करण्यासाठी तरुण वर्गाची कमतरता आहे. तर दुसरीकडे युक्रेन युद्धासाठी स्थानिक तरुणांची मोठ्या प्रमाणावर लष्करामध्ये भरती करण्यात आली आहे, त्यामुळे नागरी कामांसाठी मनुष्यबळ उरलेले नाही. रशियन श्रम मंत्रालयानुसार, या दशकाच्या अखेरपर्यंत देशाला सुमारे १.१ कोटी अतिरिक्त कामगारांची गरज भासणार आहे. २०२४ मध्ये रशियाने ७२,००० भारतीयांना वर्क परमिट दिले असून, हा एकूण विदेशी कोट्याचा एक तृतीयांश हिस्सा आहे.
वाचा - सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
फसवणूक टाळा; 'असा' मिळवा व्हिसा
- रशियामध्ये नोकरी मिळवण्यासाठी अधिकृत मार्गाचाच अवलंब करणे सुरक्षित आहे.
- नोंदणीकृत एजन्सी : भारत सरकारने परवाना दिलेल्या भर्ती एजन्सींशी संपर्क साधा. (उदा. Layboard, Naukri किंवा BCM Group सारखी दालने).
- इनव्हिटेशन लेटर : रशियन गृह मंत्रालयाकडून जारी केलेले निमंत्रण पत्र सर्वात महत्त्वाचे आहे. त्याशिवाय वर्क व्हिसा मिळत नाही.
- आवश्यक कागदपत्रे : पासपोर्ट, मेडिकल सर्टिफिकेट (HIV चाचणीसह), पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आणि शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक आहेत.
- व्हिसा फी : २,००० ते १०,००० रुपयांच्या दरम्यान असून व्हिसा मिळण्यास ७ ते २० दिवस लागतात.
