Hoshi Takayuki : जैन धर्मात कोट्यवधी रुपयांची संपत्ती सोडून सन्यासी बनल्याच्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. तिक सुखांच्या मागे धावणाऱ्या या जगात असा निर्णय घेणे भारतात नवीन नाही. मात्र, जपानमधील एका अब्जाधीशाने आपल्या कोट्यवधींच्या साम्राज्याचा त्याग करून शिवभक्त बनण्याचा निर्णय घेतल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. टोकियोमध्ये १५ सौंदर्य उत्पादनांच्या दुकानांचे मालक असलेले ४१ वर्षीय होशी ताकायुकी आता "बाला कुंभ गुरुमुनी" या नावाने ओळखले जात आहेत.
व्यवसायाचा त्याग, शिवभक्तीची निवड
होशी ताकायुकी हे आता भगव्या वस्त्रांत दिसणारे शिवभक्त आहेत. त्यांनी आपला भरभराटीचा व्यवसाय सोडून आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली आहे. एकेकाळी टोकियोमध्ये १५ यशस्वी सौंदर्य उत्पादनांचे मोठे मालक असलेले ताकायुकी, आता उत्तराखंडमध्ये भगवान शिवाच्या उपासनेत लीन आहेत. त्यांनी २० जपानी अनुयायांसह नुकतीच कावड यात्रा केली, ज्यात ते पवित्र गंगाजल घेऊन अनवाणी चालताना दिसले. त्यांच्या यात्रेदरम्यान, त्यांनी देहरादूनमध्ये कावड यात्रेकरूंसाठी दोन दिवसांचे अन्न शिबिरही आयोजित केले होते.
मागील जन्माचे रहस्य आणि आध्यात्मिक वळण
ताकायुकींचा आध्यात्मिक प्रवास २० वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये सुरु झाला. तिथे त्यांना नाडी ज्योतिषाची ओळख झाली, जी प्राचीन ताडपत्रांवरून जीवनाचा अर्थ लावते. या वाचनातून त्यांना कळले की, त्यांनी मागील आयुष्य हिमालयात घालवले होते आणि हिंदू अध्यात्माचे पालन करणे हिच त्यांची नियती होती. ताडपत्रांवर स्पष्ट लिहिले होते की "तुमचे मागील आयुष्य उत्तराखंडमध्ये गेले होते." त्यानंतर काही दिवसांनी त्यांना एक स्वप्न पडले, ज्यात त्यांनी स्वतःला उत्तराखंडमधील एका गावात पाहिले. या अनुभवाने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.
शिवमंदिरांचे बांधकाम आणि आश्रम उघडण्याची योजना
या अनुभवानंतर, ताकायुकींनी आपले व्यावसायिक साम्राज्य अनुयायांकडे सोपवून बालकुंभ गुरुमुनी हे नवीन नाव स्वीकारले. त्यांनी टोकियोमधील आपले घर पूर्णपणे शिवमंदिरात रूपांतरित केले आणि जपानमध्ये आणखी एक मंदिरही बांधले. आता त्यांची योजना पुद्दुचेरीमध्ये ३५ एकर जमिनीवर एक विशाल शिव मंदिर बांधण्याची आहे, तसेच लवकरच उत्तराखंडमध्ये एक आश्रम उघडण्याचीही त्यांची तयारी आहे.
उत्तराखंडशी विशेष नाते
होशी ताकायुकी सांगतात, "मला वाटते की मी माझे मागील आयुष्य येथे घालवले आहे. मी अजूनही त्या पर्वतांमध्ये माझे गाव शोधत आहे." त्यांचे मित्र रमेश सुंदरियाल (जे पौरी गढवालचे असून जपानमध्ये वास्तव्यास आहेत) यांच्या मते, ताकायुकी यांना देवभूमी उत्तराखंडशी खूप जवळचे नाते वाटते. या जपानी शिवभक्ताची कहाणी भारतीय अध्यात्माची ताकद आणि तिचा जगभरातील प्रभाव दर्शवते.