Work From Home: कोरोना महासाथीच्या काळात बहुतांश कंपन्यांना सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं होतं. कोरोनाची महासाथ संपल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना परतही बोलावलं. परंतु त्यानंतरही काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देत होत्या. परंतु आता त्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. टेक जायंट मायक्रोसॉफ्टने एका ब्लॉग पोस्टमध्ये घोषणा केली आहे की पुढील वर्षापासून त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसला येणं बंधनकारक असेल. हे नवीन धोरण प्रथम वॉशिंग्टनमधील रेडमंड येथील कंपनीच्या मुख्यालयाभोवती राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलं जाईल.
नवीन धोरण कोणला लागू होणार?
मायक्रोसॉफ्टच्या चीफ पीपल ऑफिसर एमी कोलमन यांच्या मते, हे धोरण तीन टप्प्यात लागू केले जाईल. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाभोवती राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश असेल, त्यानंतर ते हळूहळू अमेरिकेतील इतर कार्यालयं आणि आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत विस्तारित केलं जाईल. "काहींसाठी हा मोठा बदल नाही, परंतु काहींसाठी हा एक मोठा बदल असू शकतो. म्हणूनच आम्ही ते लागू करण्यासाठी वेळ दिला आहे," असंही ते म्हणाले.
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
ब्लॉगनुसार, मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयापासून ५० मैलांच्या आत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी २०२६ पर्यंत आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात यावं लागेल. इतर अमेरिकन कार्यालयांसाठी वेळापत्रक आणि तपशील लवकरच जाहीर केले जातील, तर अमेरिकेबाहेरील कर्मचाऱ्यांसाठी याची २०२६ मध्ये सुरुवात होईल.
वर्क फ्रॉम होम संपणार का?
कोविड-१९ महासाथीच्या काळात, कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी घरून काम करण्यास सुरुवात केली, जी खूप लोकप्रिय झाली, परंतु आता Amazon सारख्या अनेक टेक कंपन्या हे धोरण बदलत आहेत आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत बोलावत आहेत. मायक्रोसॉफ्टचं हे पाऊल देखील त्याच दिशेनं टाकलेलं आणखी एक पाऊल आहे.