देशात सध्या १० रूपयांच्या नोटांऐवजी नाणं चर्चेत आहे. अनेक दुकानदारांनी हे नाणं खोटं असल्याचं सांगितले आहे. तुमच्यासोबतही असा प्रसंग घडलाय का? बाजारात १० रूपयांचं बनावट नाणं आलंय का अशी शंका बरेच जण उपस्थित करत आहेत. त्यामुळे नेमकं हे नाणं खरं की खोटं हे जाणून घेऊया.
१० रूपयांच्या नाण्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याचा खुलासा केला आहे. आरबीआयनं पहिल्यांदा २००५ साली १० रूपयांचं नाणं जारी केले होते. त्यानंतर १ वर्षांनी जनतेच्या खिशापर्यंत हे नाणे आले. परंतु तेव्हाचं नाणं हे सध्या बाजारात असलेल्या नाण्यापेक्षा खूप वेगळे आहे. हे नाणं बनवण्यासाठी २ धातुंचा वापर केला जातो. नाण्याचा आतील भाग तांबे-निकेलपासून बनलेला आहे आणि बाहेरील भाग अॅल्युमिनियम-कांस्यापासून बनलेला आहे.
१४ डिझाईनमध्ये छापलं नाणं
भारतीय रिझर्व्ह बँकेने पुढे सांगितले की, आतापर्यंत १४ डिझाईनमध्ये १० रूपयांचे नाणे छापण्यात आले आहे. या डिझाईनमध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांचा समावेश आहे. नव्या नाण्यामध्ये रूपयांचे प्रतिक' ₹' असं चिन्ह आहे. जे जुन्या नाण्यांमध्ये नाही. त्यामुळे जर तुमच्याकडून कुणी १० रूपयांचे नाणे घेण्यास नकार देत असेल तुम्ही त्या नाण्याला खोटे समजण्याची चूक करू नका. नोटाबंदीनंतरही बाजारात १० रूपयांची खोटी नाणी आल्याची अफवा पसरली होती. मात्र आरबीआयने सर्व डिझाईनची १० रूपयांची नाणी वैध आणि खरी असल्याचं स्पष्ट केले आहे.
दरम्यान, २०११ मध्ये भारत सरकारने अधिकृतपणे रुपयाचे चिन्ह (₹) जारी केले. या तारखेनंतर काढलेल्या नाण्यांवर हे चिन्ह असेल. परंतु त्या तारखेपूर्वी काढलेल्या नाण्यांवर हे चिन्ह नसेल. काही लोक जाणूनबुजून खोट्या बातम्या पसरवत आहेत. जेणेकरून जनता आणि व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल. जेव्हा एखादे नाणे बराच काळ चलनात असते तेव्हा बाजारात जुन्या आणि नवीन दोन्ही डिझाइन एकाच वेळी दिसणे स्वाभाविक आहे. मात्र चुकीची माहिती पसरवण्यासाठी याचा वापर केला जात आहे. परंतु आरबीआयने व्हॉट्सअपवर येणारी कुठलीही अफवा आणि चुकीचा मेसेजवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केले आहे.