Iran-US-Israel : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल बाजारावर गंभीर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत, जगभरात तेलाचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी जगातील सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती सवलत दिली आहे. या निर्णयामुळे जागतिक तेलपुरवठ्यात निर्माण झालेली कमतरता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेची तात्पुरती परवानगी
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने १२ मार्च २०२६ रोजी तात्पुरता परवाना जारी केला आहे. या परवान्यानुसार १२ मार्चपर्यंत जहाजांमध्ये लोड झालेले रशियन कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी-विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी ११ एप्रिलपर्यंत (वॉशिंग्टन वेळेनुसार मध्यरात्र) लागू राहणार आहे. या निर्णयामुळे जगभरातील सुमारे ३० वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले अंदाजे १२४ ते १२५ मिलियन बॅरल रशियन तेल बाजारात पोहोचण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
यापूर्वी ५ मार्च रोजी अमेरिकेने भारताला समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाच्या कार्गो खरेदीसाठी ३० दिवसांची वेगळी सवलत दिली होती. त्या निर्णयाचा उद्देश तेल आयात करणाऱ्या देशांना संकटाच्या काळात दिलासा देणे हा होता. अमेरिकेचे वित्त मंत्री स्कॉट बेसेंट यांनी स्पष्ट केले की, ही सवलत मर्यादित कालावधीसाठी आणि विशेष परिस्थितीत दिली आहे. त्यांच्या मते, या निर्णयामुळे रशियाला मोठा आर्थिक फायदा होणार नाही.
रणनीतिक तेल साठ्यातून पुरवठा
दरम्यान, अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने जाहीर केले आहे की, अमेरिका आपल्या तेल साठ्यातून १७२ मिलियन बॅरल कच्चे तेल बाजारात सोडणार आहे. वाढत्या इंधन किमती नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (IEA) सोबतच्या संयुक्त योजनेचा भाग आहे. विशेष म्हणजे, या एजन्सीच्या ३२ सदस्य देशांनी मिळून सुमारे ४०० मिलियन बॅरल तेल बाजारात सोडण्याचे आश्वासन दिले आहे.
युद्धापूर्वी तेलाच्या किमती कमी
इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे मिडल ईस्टमधील परिस्थिती गंभीर झाली आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर Strait of Hormuz जवळपास बंद झाल्याने जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. हा समुद्री मार्ग जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असून जगातील एकूण दैनंदिन तेल वापरापैकी सुमारे २० ते २५ टक्के तेल याच मार्गाने वाहून नेले जाते. संघर्ष सुरू होण्यापूर्वी २८ फेब्रुवारीपूर्वी कच्च्या तेलाची किंमत सुमारे ७३ ते ७५ डॉलर प्रति बॅरल होती. मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर आणि खाडी परिसरात जहाजांवर हल्ले झाल्यानंतर तेलाच्या किमती वेगाने वाढून १०० डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त झाल्या.
