- चंद्रकांत दडस
वरिष्ठ उपसंपादक
२०२५ मध्ये भारतात २० आयपीओंची जबरदस्त लाट आली आहे. तंत्रज्ञान, फार्मा, रिटेल, इलेक्ट्रिक वाहन, फिनटेक, आणि इन्फ्रास्ट्रक्चर अशा सर्व क्षेत्रांत कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. मोठे गुंतवणूकदार तर या उत्सवात सहभागी झाले आहेतच, पण किरकोळ गुंतवणूकदारही नवीन शेअर्स म्हणून या आकर्षणात गुंतवणुकीकडे वळले आहेत. मात्र, या ठिकाणी गुंतवणूक करताना अतिशय विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज असते, अन्यथा तोटा होण्याची शक्यता असते.
नेमके काय कराल?
कंपनीचे व्यवसाय मॉडेल, नफा, कर्ज आणि भविष्यातील वाढ याचा अभ्यास करा. लोक म्हणतात, बाजारात चर्चा आहे म्हणून गुंतवणूक करणे टाळा. कंपनीचे प्रॉस्पेक्टस आणि ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस नीट वाचा.
व्हॅल्युएशन समजून घ्या
अनेक आयपीओंची किंमत 'ओव्हरव्हॅल्यूड' असते. म्हणजेच, कंपनीचा नफा मर्यादित असतानाही भाव जास्त ठेवला जातो. 'ग्रे मार्केट प्रीमियम' (जीएमपी) पाहून गुंतवणूक न करता, प्रत्यक्ष बॅलन्स शीटचा अभ्यास करा.
लवकर नफा; मोहात पडू नका
'लिस्टिंग गेन्स' मिळवण्यासाठी आयपीओ घेतले जातात, पण बाजार अस्थिर असताना हे जोखमीचे ठरू शकते. दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो.
पोर्टफोलिओ संतुलित ठेवा
सर्व पैसा एका आयपीओत गुंतवू नका. शेअर्स, म्युच्युअल फंड्स व बाँड्स यांचा समतोल ठेवा. आयपीओ गुंतवणुकीचा एक भाग असावा, पर्याय नव्हे.
सल्लागारांचा सल्ला घ्या
नवीन गुंतवणूकदारांनी तज्ज्ञांचा किंवा सेबी-नोंदणीकृत सल्लागारांचा सल्ला घ्यावा. फसव्या योजनांपासून, टिप्सपासून आणि सोशल मीडियावरील गोंधळापासून दूर राहा.
