America Trade Tariff: अमेरिकेत सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. किराणा मालापासून ते रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंपर्यंत, सर्वत्र किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अनेक खाद्यपदार्थांवर लावलेलं टॅरिफ मागे घेतलं आहेत. हा निर्णय केवळ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात नाही, तर सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारी मोठी आशाही निर्माण करतो.
टोमॅटो आणि केळीवरील आयात शुल्क हटवलं
ट्रम्प प्रशासनानं शुक्रवारी घोषणा केली की टोमॅटो, केळी सह डझनावारी खाद्य उत्पादनांवर लावलेलं हेवी इम्पोर्ट ड्युटी (Heavy Import Duty) परत घेण्यात येत आहे. ही नवीन सूट गुरुवार मध्यरात्रीपासूनच प्रभावी झाली आहे, म्हणजेच हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल. ट्रम्प यांचं हे पाऊल चर्चेचा विषय ठरलं आहे, कारण त्यांनी यापूर्वी वारंवार दावा केला होता की त्यांच्याद्वारे लावलेलं टॅरिफ महागाई वाढवत नाहीत. मात्र, वाढत्या किमती आणि ग्राहकांचा असंतोष यामुळे परिस्थिती बदलली आहे.
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
फळे-भाज्यांच्या किमती गगनाला
अमेरिकेत कॉफी, टोमॅटो आणि केळीसारख्या रोजच्या वस्तूंचे दर झपाट्यानं वाढले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, सप्टेंबरपर्यंत ग्राउंड बीफच्या किमती १३% आणि स्टेकच्या किमती १७% पर्यंत वाढल्या होत्या, जो तीन वर्षांतील सर्वात मोठा वाढीव दर आहे. तर, केळी ७% नं महाग झाली आणि टोमॅटोच्या किमतीत १% वाढ झाली आहे. एकूणच, घरी खाल्ल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती २.७% नी वाढल्या आहेत.
ट्रम्प प्रशासनावर निवडणुकीचा दबाव
या वाढत्या किमतींमुळे ट्रम्प सरकारवर निवडणुकांचा दबाव देखील वाढू लागला होता. व्हर्जिनिया, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये झालेल्या अलीकडील स्थानिक निवडणुकांमध्ये डेमोक्रॅट्सचा विजय आणि लोकांची नाराजी यामुळे महागाई हा एक मोठा मुद्दा बनला होता. याच कारणामुळे, ट्रम्प यांनी सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक खाद्यपदार्थांवरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मानलं जात आहे.
व्यापार करारावर वाद
टॅरिफ रद्द करण्याबरोबरच, अमेरिकेने अर्जेंटिना, इक्वाडोर, ग्वाटेमाला आणि एल साल्वाडोर या देशांसोबत व्यापार कराराच्या दिशेनंही पाऊल टाकलं आहे. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या देशांतून येणाऱ्या अनेक खाद्य उत्पादनांवर आयात कर पूर्णपणे हटवला जाईल. मात्र, विरोधी डेमोक्रॅट नेते रिचर्ड नील यांनी ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली. ट्रम्प प्रशासन तीच आग विझवत आहे, जी त्यांनी स्वतः लावली होती, असं नील यांनी म्हटलंय. त्यांच्या दाव्यानुसार, टॅरिफमुळेच महागाई वाढली आणि उत्पादन सतत खाली जात आहे.
