इंडसइंड बँकेत (IndusInd Bank) गेली १० वर्षे अकाउंटिंगमध्ये मोठा घोटाळा सुरू होता, असा खळबळजनक आरोप बँकेचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) आणि व्हिसलब्लोअर गोविंद जैन यांनी केला आहे. गोविंद जैन यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर (EoW) दाखल केलेल्या तक्रारीत, बँकेच्या डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमधील अकाउंटिंग अनियमितता २०१५ पासून सुरू असल्याचं म्हटलं आहे. तत्कालीन संचालक मंडळ, वरिष्ठ व्यवस्थापन आणि माजी वित्त प्रमुख एस. व्ही. जरेगावकर यांना याची पूर्ण माहिती होती, असंही त्यांनी नमूद केलंय.
गोविंद जैन यांनी आपल्या तक्रारीत अनेक कागदपत्रे, तसंच तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत काथपालिया यांना पाठवलेली चार राजीनामा पत्रे सादर केली आहेत. या पत्रांमध्ये त्यांनी वेळोवेळी स्वतंत्र ऑडिटर नियुक्त करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
दरम्यान, या प्रकरणाची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) देण्यात आली असून, ते 'फसवणूक' (Fraud) या श्रेणीत नोंदवण्यात आले आहे. तसेच, कायद्यानुसार सर्व तक्रारी संबंधित एजन्सींना सोपवण्यात आल्या आहेत, अशी माहिती बँकेच्या प्रवक्त्यांनी दिली.
राजीनामे आणि वादग्रस्त घटनाक्रम
गोविंद जैन यांनी पहिला राजीनामा ११ जून २०२४ रोजी सादर केला होता. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की, ते जून तिमाहीच्या निकालांवर स्वाक्षरी करणार नाहीत, परंतु काथपालिया यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही.
२० ऑगस्ट २०२४: जैन यांनी दुसरा राजीनामा पाठवला आणि पुढे काम करू शकत नसल्याचं म्हटलं.
२९ सप्टेंबर २०२४: त्यांनी स्वतंत्र ऑडिट आवश्यक असल्याचं सांगत, त्याशिवाय बँकेला मोठं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली. ही स्थिती त्यांच्या करिअर आणि प्रतिष्ठेसाठी घातक ठरू शकते, असंही जैन यांनी म्हटलं होतं.
३० सप्टेंबर २०२४: त्यांनी पुन्हा PwC द्वारे ऑडिट सुरू न झाल्यास आपण राजीनामा देऊ, असा इशारा दिला.
१७ जानेवारी २०२५: अखेर, जैन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला.
यानंतर, १० मार्च २०२५ रोजी बँकेनं खुलासा केला की, डेरिव्हेटिव्ह व्यवहारातील गडबडीमुळे त्यांना १,५७७ कोटी रुपयांचा संभाव्य फटका बसू शकतो. अनेक ऑडिटनंतर बँकेनं मार्च तिमाहीच्या निकालांमध्ये सुमारे २,००० कोटी रुपयांचे एकरकमी नुकसान नोंदवलं.
इनसाइडर ट्रेडिंगचे आरोप
EoW च्या चौकशीदरम्यान, अनेक अधिकाऱ्यांनी आरोप केला की, जैन यांनी दबाव टाकल्यानंतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेत आपले शेअर्स विकले. याच काळात काथपालिया आणि माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण खुराना यांनी अनुक्रमे १३४ कोटी रुपये आणि ८२ कोटी रुपयांचे शेअर्स विकल्याचा आरोप आहे.