लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: गेल्या वर्षी विमान उड्डाणे रद्द करून घातलेल्या घोळामुळे देशातील सर्वात मोठी विमानवाहतूक कंपनी इंडिगोचे 'अर्थ'विमान कोसळले आहे. कंपनीला डिसेंबर तिमाहीत मोठा फटका बसला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा तब्बल ७८ टक्क्यांनी घसरून ५४९.१ कोटी रुपयांवर आला, तर मागील वर्षी याच तिमाहीत २,४४८.८ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
कंपनीच्या निवेदनानुसार, तिसऱ्या तिमाहीत इंडिगोला एकूण १,५४६.५ कोटींचा आर्थिक फटका बसला. यामध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या व्यापक उड्डाण अडचणींमुळे ५७७.२ कोटी रुपयांचे नुकसान झाले, तर नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे ९६९.३ कोटींचा भार पडला.
उड्डाण रद्द, प्रवासी प्रभावित
३ ते ५ डिसेंबरदरम्यान एकूण २,५०७ उड्डाणे रद्द झाली आणि १,८५२ उड्डाणांना विलंब झाला, ज्यामुळे देशभरात ३ लाखांहून अधिक प्रवाशांवर परिणाम झाला. परिणामी डीजीसीएने १० फेब्रुवारीपर्यंत इंडिगोच्या हिवाळी वेळापत्रकात १० टक्के कपात करण्याचे आदेश दिले. १७ जानेवारी रोजी डीजीसीएने २२.२० कोटी रुपयांचा दंड लावला आणि सीईओ पीटर एल्बर्स तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. तसेच ५० कोटींची बँक हमी देण्याचेही आदेश दिले होते. दंड नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या उड्डाण घोळासाठी इंडिगोवर लावला असून तो ‘अपवादात्मक खर्च’ म्हणून नोंदवण्यात आला आहे.
एकूण उत्पन्नात वाढ
इंटरग्लोब एव्हिएशन या इंडिगोच्या पालक कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २४,५४०.६ कोटींचे एकूण उत्पन्न नोंदवले आहे. मागील वर्षी याच कालावधीत २२,९९२.८ कोटी रुपये उत्पन्न झाले होते. यंदा त्यात ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी सांगितले, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ऑपरेशनल अडचणींमुळे उड्डाणे रद्द करावी लागली आणि विलंब झाला. तरीदेखील, इंडिगोने या तिमाहीत २४५ अब्ज रुपयांचे एकूण उत्पन्न आणि ५ अब्ज रुपयांचा नफा कमावला, तर अपवादात्मक खर्च आणि चलनातील बदल वगळल्यास हा नफा ३१ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचला.” “आमचे दीर्घकालीन मूळ तत्त्व मजबूत आहेत; आम्ही स्थिरतेकडे वाटचाल करत आहोत,” असे एल्बर्स म्हणाले.
