Indigo flights: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो मागील काही दिवसांपासून मोठ्या ऑपरेशनल संकटातून जात आहे. यामुळे हजारो प्रवाशांना उड्डाणं रद्द होणं, मोठा विलंब आणि माहितीचा अभाव अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
कंपनीनं एक सार्वजनिक निवेदन जारी करून सर्व ग्राहकांची माफी मागितली आहे. इंडिगोनं म्हटलंय की, प्रवाशांना झालेल्या मागील दिवसांच्या अडचणीची त्यांना जाणीव आहे आणि लवकरात लवकर सेवा सामान्य करण्यासाठी ते पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. इंडिगोच्या म्हणण्यानुसार, आज सर्वाधिक उड्डाणं रद्द केली जात आहेत, जेणेकरून सर्व सिस्टीम रीबूट करता येतील आणि उद्यापासून टप्प्याटप्प्यानं कामकाजात सुधारणा सुरू करता येईल.
एका वर्षात देशभरात येणार इलेक्ट्रॉनिक टोल, पाहा काय म्हणालेत नितीन गडकरी
ग्राहकांसाठी कंपनीनं उचलली पावलं
प्रवाशांच्या सोयीसाठी एअरलाइन्सनं अनेक उपाययोजनांची घोषणा केल्याचं सांगण्यात येत आहे. रद्द झाल्यावर संपूर्ण शुल्क माफ करणं, ५ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या बुकिंगवर रिशेड्युल आणि कॅन्सलेशन शुल्कातून सूट देणं, ऑटो रिफंडसारख्या सुविधा देत आहे. गरजू प्रवाशांसाठी शहरांमध्ये हॉटेल आणि सर्फेस ट्रान्सफरसारख्या तसंच विमानतळांवर स्नॅक्स आणि फूडची उपलब्धता, ज्येष्ठ नागरिकांसाठी लाउंजमध्ये प्रवेश सारख्या सुविधा पुरवण्यात येत असल्याचंही कंपनीनं म्हटलंय.
कंपनीने प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी आपल्या उड्डाणाची स्थिती (flight status) ऑनलाईन तपासावी आणि रद्द झालेल्या फ्लाईटसाठी विमानतळावर येऊ नये. कामकाज हळूहळू सामान्य होईल आणि त्यांना कोणत्याही किमतीवर ग्राहकांचा विश्वास गमावायचा नाही, असंही इंडिगोनं म्हटलंय.
माहितीनुसार, शुक्रवारी देशभरात इंडिगोची शेकडो उड्डाणं रद्द झाली आहेत. एकट्या दिल्ली विमानतळावर एकूण २२५ उड्डाणे (१३५ प्रस्थान आणि ९० आगमन) रद्द करण्यात आली आहेत. यामुळे देशभरातील हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. यापूर्वी गुरुवारीही देशभरात सुमारे ४०० उड्डाणे रद्द करण्यात आली होती. इंडिगोनं म्हटलंय की, ते लवकरात लवकर परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठी त्यांनी प्रवाशांकडून सहकार्य करण्याचं आवाहनही केलंय.
