नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारतातून प्रवासी वाहनांच्या निर्यातीमध्ये तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मारुती सुझुकी इंडिया या कंपनीने दोन लाखांहून अधिक गाड्या निर्यात करून सर्वाधिक निर्यातदार म्हणून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे, असे सियामने म्हटले आहे.
कोणत्या देशांत वाढली मागणी?
भारतीय वाहन निर्यातीतील ही वाढ पश्चिम आशिया आणि लॅटिन अमेरिका या बाजारपेठांमधील वाढत्या मागणीमुळे झाली आहे. भारताने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत २४ देशांमध्ये निर्यात वाढवली, ज्यात दक्षिण कोरिया, यूएई, जर्मनी, टोगो, इजिप्त, व्हिएतनाम, इराक, मेक्सिको, रशिया, केनिया, नायजेरिया, कॅनडा, पोलंड, श्रीलंका, ओमान, थायलंड, बांगलादेश, ब्राझील, बेल्जियम, इटली आणि टांझानिया या देशांचा समावेश आहे.
अमेरिकेत विक्रीत घट का? : अमेरिकेत हाेणाऱ्या निर्यातीत काहीशी घट नोंदवण्यात आली आहे. सियामनुसार, याचे प्रमुख कारण म्हणजे उच्च आयात शुल्क आणि स्थानिक धोरणातील बदल हे आहे.
अमेरिकेच्या टॅरिफमुळे अमेरिकेत वाहन निर्यात कमी झाली असली तरीही भारताने विक्रीसाठी नवीन बाजारपेठ शोधली आहे.
