Railways Book Now Pay Later Scheme : भारतात आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला अधिक पसंती दिली जाते. याची २ मुख्य कारणे आहेत. सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवास. फक्त तुमचं आसन आरक्षित असायला हवं. तुम्हीही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा आणि सोयीस्कर करण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने ‘आता बुक करा, नंतर पैसे द्या’ (Book Now, Pay Later) ही नवीन योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत, प्रवासी कोणतेही आगाऊ पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करू शकतात. आणि नंतर पैसे देऊ शकतात. आपण, ऑनलाईन वस्तू किंवा फूड ऑर्डर करताना वस्तू हातात मिळाल्यानंतर जसे पैसे देतो, ही योजना तशीच आहे, असं समजा. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल पण तिकीट बुकिंगच्या वेळी तुमच्याकडे पैसे नसतील तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विशेष म्हणजे तुम्हाला तिकिटाचे पैसे भरण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी मिळतो.
रेल्वेच्या ‘बुक नाउ, पे लेटर’ या सुविधेचा वापर करून तुम्ही मुदतीच्या आत पेमेंट केले, तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. पण, जर तुम्ही १४ दिवसांच्या आत पैसे भरले नाही तर तुम्हाला ३.५% सेवा शुल्क भरावे लागेल. ही सुविधा फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंगवर उपलब्ध आहे.
पे लेटर ही योजना कशी वापरायची?
- सर्वप्रथम तुमच्या IRCTC App किंवा वेबसाईटवरुन खात्यात लॉग इन करा.
- 'Book Now' पर्यायावर क्लिक करा.
- प्रवाशांची माहिती आणि कॅप्चा भरुन सबमिट करा.
- पेमेंट पेजवर तुम्हाला क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा भीम ॲपद्वारे पैसे भरण्याचा पर्याय मिळेल.
- तुम्हाला ‘नंतर पैसे द्या’चा लाभ घ्यायचा असल्यास, तुम्हाला प्रथम www.epaylater.in वर जाऊन नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला ‘नंतर पैसे द्या’ हा पर्याय मिळेल.
- हा पर्याय निवडून तुम्ही कोणतीही आगाऊ रक्कम न भरता तिकीट बुक करू शकता.
प्रवाशांसाठी फायदेशीर
अचानक प्रवासाचा प्लॅन करणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर आहे. अनेकदा आपल्याला बुकिंग करायचं असतं पण त्यावेळी आपल्या खात्यात पैसे नसतात. या सुविधेमुळे आपल्याला कोणत्याही तणावाशिवाय तिकीट बुक करण्याचे स्वातंत्र्य मिळते. फक्त, एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळेआधी है पेसे भरणे आवश्यक आहे. अन्यथा तिकिटापेक्षा जास्त दंड भरावा लागेल,