Mark Zukerberg: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अफाट संपत्ती निर्माण करणाऱ्या नव्या पिढीच्या तरुणांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. मर्कोर (Mercor) या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्टार्टअपने ब्रेंडन फूडी, आदर्श हिरेमठ आणि सूर्या मिधा यांना जगातील सर्वात तरुण ‘सेल्फ-मेड’ अब्जाधीश (Self-made Billionaires) बनवले आहे.
यातील आदर्श हिरेमठ आणि सूर्या मिधा हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असून, त्यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गचा विक्रम मोडला आहे. झुकरबर्ग 2008 मध्ये 23 वर्षांचे असताना सर्वात तरुण अब्जाधीश बनले होते. आता हे तीन तरुण फक्त 22 वर्षांचे असून, त्यांनी झुकरबर्गचा रेकॉर्ड मोडला आहे.
AI स्टार्टअपचे अफाट यश
फोर्ब्सच्या अहवालानुसार, सॅन फ्रान्सिस्कोस्थित ‘मर्कोर’ने नुकतीच 350 मिलियन डॉलर्स (सुमारे ₹2,900 कोटी) इतकी फंडिग मिळवली आहे. या गुंतवणुकीनंतर कंपनीचे मूल्यांकन तब्बल 10 अब्ज डॉलर्स (₹83,000 कोटी) झाले आहे.
या यशानंतर मर्कोरचा संस्थापक ब्रेंडन फूडी (CEO), आदर्श हिरेमठ (CTO) आणि सूर्या मिधा (Board Chairman) हे तिघेही जगातील सर्वात तरुण सेल्फ-मेड अब्जाधीश बनले आहेत. यातील सूर्या आणि आदर्श या दोघांनी कॅलिफोर्नियातील बेलार्माइन कॉलेज प्रिपरेटरी मध्ये शिक्षण घेतले आहे.
कॉलेज सोडून ‘मर्कोर’ची निर्मिती
ही कल्पना तीन मित्रांच्या हायस्कूल काळात जन्मली. त्या वेळी हिरेमठ हार्वर्ड विद्यापीठात, मिधा आणि फूडी जॉर्जटाउन विद्यापीठात अनुक्रमे शिकत होते. स्टार्टअपवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी तिघांनी जवळपास एकाच वेळी कॉलेज सोडले. तिघेही ‘थिएल फेलोज’ आहेत, म्हणजेच अब्जाधीश उद्योजक पीटर थिएल यांच्या फेलोशिप अंतर्गत तरुण उद्योजकतेसाठी निवडलेले विद्यार्थी आहेत.
