India Government On Fertilizer Industry: मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळ विस्कळीत झाली आहे. भारतासह अनेक देशांवर गंभीर ऊर्जा संकट ओढवले आहे. विविध कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने खते आणि रसायन उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे. सरकारने अमोनियम नायट्रेटसह अनेक पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील आयात शुल्कात पूर्ण सूट जाहीर केली आहे. ही सूट २ एप्रिल ते ३० जून या कालावधीसाठी लागू राहणार आहे.
४० हून अधिक रसायनांवरील आयात शुल्क रद्द
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सुमारे ४० प्रकारच्या पेट्रोकेमिकल कच्च्या माल आणि मध्यवर्ती उत्पादनांवरील आयात शुल्क शून्य करण्यात आले आहे. यात अमोनियम नायट्रेट, मेथनॉल, फिनॉल, पीव्हीसी, पॉलीप्रोपायलीन यांसारख्या महत्त्वाच्या रसायनांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर युद्ध आणि पुरवठा संकटामुळे उद्योगांवरील खर्चाचा ताण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
In light of the ongoing conflict in West Asia and the consequent disruptions in global supply chains, the Government of India has decided to provide full Customs Duty exemption on critical petrochemical products till 30th June, 2026.
— ANI (@ANI) April 2, 2026
Exemption will benefit sectors dependent on… pic.twitter.com/6P3MgHMz7j
खतं कंपन्यांना मोठा फायदा
सरकारच्या या निर्णयामुळे खत उत्पादक कंपन्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. अमोनियम नायट्रेट हे खत निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे रसायन असून, आयात शुल्क हटवल्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्याची शक्यता आहे. तसेच अमोनियम नायट्रेटवरील कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकरही रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे खत उद्योगाला अतिरिक्त आर्थिक दिलासा मिळणार आहे.
महागाई नियंत्रणाला मदत
आयात शुल्क हटवल्यामुळे उद्योगांना कच्चा माल स्वस्त मिळणार असून, उत्पादन खर्च कमी होईल. यामुळे वस्तूंच्या किमती स्थिर राहण्यास मदत होऊन महागाई नियंत्रणात ठेवण्यासही मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे. मेथनॉल, अॅसिटिक आम्ल, फिनॉल, टोल्युइन आणि अमोनिया यांसारखी रसायने जवळपास सर्व रसायन उद्योगांमध्ये वापरली जात असल्याने या निर्णयाचा व्यापक परिणाम दिसून येणार आहे.
अनेक उद्योगांना होणार फायदा
पेट्रोकेमिकल आणि प्लास्टिक कच्च्या मालावरील शुल्क हटवल्यामुळे पॅकेजिंग, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्राहक वस्तू उत्पादन क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. तसेच पीव्हीसी पाइप, पेंट, कोटिंग, इन्सुलेशन साहित्य, वाहनांचे प्लास्टिक पार्ट्स आणि सीट फोम तयार करण्यासाठीही या रसायनांचा वापर होतो. याशिवाय काही रसायने औषध उद्योगातही वापरली जात असल्याने औषध उत्पादनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. अमोनियम नायट्रेटवरील शुल्क हटवल्यामुळे खतांचा पुरवठा सुरळीत राहून त्यांच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत होणार आहे.
