लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वस्तू उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील सुधारलेल्या कामगिरीमुळे चालू वित्त वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर ७.४ टक्के राहण्याचा अंदाज सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत वर्तविण्यात आला आहे. हा दर वित्त वर्ष २०२४-२५ मधील ६.५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला अग्रिम अंदाज बुधवारी जाहीर केला. त्यात ही आकडेवारी देण्यात आली आहे. त्यानुसार, वित्त वर्ष २०२५-२६ मध्ये वस्तू उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात सुमारे सात टक्के वाढ अपेक्षित आहे.
सेवा क्षेत्रातील मजबूत वाढीमुळे सकल मूल्यवर्धनात ७.३% वाढीचा अंदाज आहे. मात्र कृषी, वीज, गॅस व पाणीपुरवठा या क्षेत्रातील वाढ तुलनेत मर्यादित राहू शकते.
