India Manufacturing PMI : तुम्ही जर उत्पादन क्षेत्रात काम शोधत असाल किंवा काम करत असाल तर तुमची चिंता वाढवणारी बातमी आहे. देशाच्या खासगी उत्पादन क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात थोडीशी मंदी दिसून आली आहे. गेल्या चार महिन्यांतील ही सर्वात नीचांकी पातळी आहे. एचएसबीसी परचेजिंग मॅनेजर्स इंडेक्सच्या अहवालानुसार, सप्टेंबरमधील हा आकडा ५९.३ वरून घसरून ५७.७ वर आला आहे. हा आकडा ५० च्या वर असल्याने उत्पादन क्षेत्रात विस्तार होत असल्याचे स्पष्ट असले तरी, या विस्ताराचा वेग मात्र मंदावला आहे. अमेरिकेच्या शुल्क धोरणाचा या क्षेत्रावर थेट परिणाम झाला आहे.
गती मंदावली पण विस्तार कायम
परचेजिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) म्हणजे काय?
हा निर्देशांक मासिक आधारावर उत्पादन क्षेत्रातील घडामोडींवर अहवाल देतो. जर पीएमआयचा आकडा ५० च्या वर असेल, तर तो क्षेत्राचा विस्तार आणि वाढ दर्शवतो, तर ५० च्या खालील आकडा मंदी दाखवतो. सप्टेंबरमध्ये ५७.७ हा आकडा विस्ताराचा असला तरी, तो मागील महिन्यांपेक्षा कमी आहे.
चिंतेची बाब: नवीन ऑर्डर, उत्पादनाची गती आणि इनपुट खरेदीची गती मंदावल्यामुळे उत्पादन क्षेत्रावर थेट परिणाम झाला आहे.
रोजगार निर्मितीवर ब्रेक
सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे नवीन रोजगार निर्मिती. या सर्वेनुसार, नवीन रोजगार निर्मितीचा दर या वर्षातील सर्वात कमी राहिला आहे. याचा थेट अर्थ असा होतो की, बाजारात नवीन रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. केवळ २ टक्के कंपन्यांनीच नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.
जीएसटी सुधारणा आणि निर्यातीचा आधार
- एचएसबीसीच्या मुख्य भारत अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांचे मत आहे की, सध्याचा PMI आकडा कमी झाला असला तरी, तो दीर्घकाळ सरासरीपेक्षा वर राहिला आहे. काही सकारात्मक घटक परिस्थिती संतुलित करू शकतात.
- जीएसटी सुधारणा: सरकारने केलेल्या जीएसटी कर सुधारणांमुळे वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळे देशांतर्गत मागणी वाढण्याची आणि उत्पादन क्षेत्राची वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
- आंतरराष्ट्रीय ऑर्डर: सप्टेंबर महिन्यात नवीन निर्यात ऑर्डरचा वेग झपाट्याने वाढला आहे. आशिया, युरोप आणि मध्यपूर्वेकडील वाढलेल्या मागणीमुळे अमेरिकावरील अवलंबित्व कमी होऊ शकते.
वाचा - ८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
एकंदरीत, काही भारतीय कंपन्यांनी पुढील १२ महिन्यांसाठी उत्पादन वाढवण्याबाबत आत्मविश्वास दाखवला आहे. मात्र, रोजगार निर्मिती वाढणे आवश्यक आहे, अन्यथा अर्थव्यवस्थेवर त्याचा दीर्घकाळ नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे.