वॉशिंगटन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या वाढीव समतुल्य आयात शुल्कामुळे अमेरिकेत एप्रिलमध्ये महागाई जबरदस्त उसळी घेण्याची शक्यता आहे.
'फॅक्टसेट'च्या डाटानुसार, एप्रिलमध्ये महागाईचा दर आदल्या वर्षाच्या तुलनेत २.४ टक्के राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या मार्चमध्येही तो तेवढाच होता. त्याआधी या वर्षाच्या सुरुवातीला तो ३ टक्के होता. मार्च ते एप्रिल या कालावधीत ग्राहक किंमत निर्देशांक मासिक आधारावर ०.३ टक्के वाढू शकतो, असे अर्थतज्ज्ञांना वाटते.
कपडे, कार, चपला, खाणेपिणे सारेच महागले
अहवालानुसार, एप्रिलमध्ये अमेरिके कपडे, पायताण, फर्निचर, खाण्यापिण्याचे साहित्य आणि कार यांच्या किमती वाढल्या. मेक्सिको आणि कॅनडा येथून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क लागू झाले आहे. चीनच्या अनेक उत्पादनांवरही शुल्क लावण्यात आले आहे. या शुल्कांचे परिणाण आता अमेरिकेत दिसू लागले आहेत.