भारतात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास जास्तीत जास्त २० ते २५ हजार रुपये दंड आकारला जातो. पण संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) जर कोणी वाहतुकीचे नियम मोडले तर त्याला भारतीय चलनात खूप मोठा दंड भरावा लागतो. विशेषतः निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्यांना खूप मोठा दंड भरावा लागतो. तो दंड इतका आहे की, तेवढ्याच रकमेच्या पावतीसह भारतात नवीन कार खरेदी केली जाऊ शकते.
अबुधाबी आणि दुबईमध्ये निष्काळजीपणे वाहन चालवल्यास ५० हजार यूएई दिरहमपर्यंत दंड होऊ शकतो. खलीज टाइम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. भारतीय चलनात ही रक्कम आजच्या घडीला ११,७८,६२२.५० रुपये इतकी आहे. एवढ्या पैशात तुम्ही भारतात नवीन कार खरेदी करू शकता. भारतात तुम्ही मारुती सुझुकी ब्रेझा, मारुती सुझुकी अर्टिगा, टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू, टाटा पंच, महिंद्रा बोलेरो निओ, ह्युंदाई आय २० एन लाइन सारख्या कार खरेदी करू शकता.
वाहतुकीचे नियम अतिशय कडक
प्रतिबंधित क्षेत्रात निष्काळजीपणे वाहन चालविणं आणि मोटारसायकल चालविणे यासारख्या गुन्ह्यांसाठी वाहन मालकाला जप्तीनंतर वाहन सोडण्यासाठी २० हजार दिरहम द्यावे लागतात. त्याचप्रमाणे विनापरवाना वाहन चालविल्यास जप्तीनंतर सुटका शुल्क ३० हजार दिरहमचा दंड आहे. याशिवाय रास अल खैमामध्ये निष्काळजीपणे वाहन चालविल्यास २० हजार दिरहमपर्यंत दंड आणि तीन महिन्यांची वाहन जप्तीची तरतूद आहे. दंड न भरल्यास आणि जप्त केलेल्या गाड्यांचा दावा तीन महिन्यांत न केल्यास रास अल खैमा येथे वाहनांचा लिलाव केला जातो.
१७ व्या वर्षी ड्रायव्हिंग लायसन्स
एमए-ट्रॅफिक कन्सल्टिंगचे संस्थापक आणि दुबई पोलिसांच्या ट्रॅफिक स्टडीज विभागाचे माजी प्रमुख डॉ. मुस्तफा अल्दाह यांच्या म्हणण्यानुसार, संयुक्त अरब अमिरातीमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याचं वय कमी करणारा नवीन कायदा २९ मार्चपासून अंमलात येणार असल्यानं मोठ्या दंडाची नवीन घोषणा योग्य वेळी झाली आहे. सध्याचे किमान वय १८ वर्षे असले तरी ते आता १७ वर्षे करण्यात येणार आहे. म्हणजेच यूएईमध्ये १७ वर्षे वयाच्या कोणालाही युएईमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची परवानगी असेल.