Hyundai Cars Price Hike: जर तुम्ही नवीन वर्षात ह्युंदाईची (Hyundai) कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आता जास्तीचे पैसे मोजावे लागतील. कंपनीने १ जानेवारीपासून आपल्या सर्व गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ह्युंदाईनं किंमतींमध्ये सरासरी ०.६% वाढ करण्याची घोषणा केली आहे. मौल्यवान धातू आणि इतर आवश्यक कच्च्या मालाच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं कंपनीनं सांगितलं.
कंपनीने स्पष्ट केलं की, ग्राहकांवरील हा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी ते उत्पादन खर्च कमी करण्याचे आणि कार्यक्षमता सुधारण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, पार्ट्सच्या वाढत्या किंमतींच्या दबावामुळे अखेर त्यांना किंचित दरवाढ करणं भाग पडलंय. ह्युंदाई ही भारतात सर्वाधिक कार विकणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. २०२५ मध्ये त्यांच्या गाड्यांना, विशेषतः Creta, Exter आणि Venue सारख्या मॉडेल्सना मोठी मागणी राहिली आहे.
इतर कंपन्यांनीही केली दरवाढ
ह्युंदाई इलेक्ट्रिक कार क्षेत्रातही वेगाने प्रगती करत आहे आणि Creta EV मुळे यावर्षी ईव्ही विक्रीला मोठी गती मिळाली आहे. ह्युंदाई व्यतिरिक्त इतर अनेक दिग्गज कार कंपन्यांनीही नवीन वर्षात दरवाढीचे संकेत दिले आहेत:
- रेनो इंडिया (Renault India): आपल्या कारच्या किंमती २% पर्यंत वाढवणार आहे.
- मर्सिडीज-बेंझ इंडिया (Mercedes-Benz India): किंमतींमध्ये २% वाढ करण्याची योजना आखत आहे.
- JSW MG Motor India आणि निसान इंडिया: वाढता इनपुट खर्च आणि लॉजिस्टिक्स खर्चामुळे जानेवारीपासून किंमतींमध्ये सुमारे २-३% वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.
