Umang App Mera Ration Feature: देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार अन्न सुरक्षा मिळावी, यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी 'रेशन कार्ड' हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. मात्र, आता रेशन कार्डची माहिती मिळवण्यासाठी किंवा सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरलेली नाही. केंद्र सरकारच्या 'उमंग' या मल्टी-सर्व्हिस डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आता 'मेरा राशन' हे नवीन आणि उपयुक्त फीचर जोडण्यात आले आहे.
काय आहे 'मेरा राशन' फिचर?
डिजिटल इंडिया मोहिमेला बळकटी देण्यासाठी सरकारने उमंग ॲपमध्ये ही सेवा सुरू केली आहे. याद्वारे रेशन कार्डशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती आता थेट मोबाईलवर पाहता येणार आहे. सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला किती धान्य मिळण्याचा अधिकार आहे आणि आतापर्यंत तुम्ही किती रेशन घेतले आहे, याची संपूर्ण पारदर्शक नोंद यावर उपलब्ध असेल.
या सुविधेचे प्रमुख फायदे
तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती रेशन मिळायला हवे आणि त्यापैकी किती घेतले गेले आहे, याचा हिशोब एका क्लिकवर मिळेल. यामुळे रेशन दुकानदार कमी धान्य देऊ शकणार नाही.
- कामासाठी नवीन ठिकाणी गेलेले मजूर किंवा नागरिक या ॲपच्या मदतीने आसपासची रेशन दुकाने शोधू शकतात. 'वन नेशन वन रेशन कार्ड' अंतर्गत ते कुठेही धान्य घेऊ शकतील.
- जुन्या रेशन व्यवहारांचा इतिहास पाहता आल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल.
- तुमच्या सध्याच्या ठिकाणानुसार जवळच्या सरकारी रेशन दुकानाचा पत्ता आणि नकाशा या फिचरमध्ये पाहता येईल.
कसा कराल वापर?
जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, तर तुम्ही खालीलप्रमाणे या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
- ॲप डाऊनलोड: गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून 'UMANG' ॲप डाऊनलोड करा.
- रजिस्ट्रेशन: मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा आणि ४ अंकी 'MPIN' सेट करा.
- सर्च करा: लॉग-इन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये 'Mera Ration' टाईप करा.
- माहिती मिळवा: तुमचा रेशन कार्ड नंबर टाकून माहिती मिळवा. रेशन कार्ड नंबर नसल्यास आधार कार्डच्या माहितीवरूनही तपशील पाहता येईल.
काय आहे हे 'जादुई' उमंग ॲप?
'उमंग' हे भारत सरकारचे एक असे 'पेटारा' आहे, जिथे शेकडो सरकारी सेवा एकत्र मिळतात. आधार कार्ड, पीएफ, पासपोर्ट, पॅन कार्डपासून ते वीज बिल भरण्यापर्यंतची कामे या एकाच ॲपवरून होतात. आता 'मेरा राशन' सेवा जोडली गेल्यामुळे हे ॲप सर्वसामान्यांसाठी अधिक शक्तीशाली आणि उपयुक्त ठरले आहे.
वाचा - आता आयटी क्षेत्रात 'गॅस' संकट; LPG च्या तुटवड्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलं 'वर्क फ्रॉम होम'
डिजिटल युगात आता रेशनची माहिती खिशात असलेल्या मोबाईलमध्ये आली आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत हक्काचे धान्य पोहोचवण्यासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
