पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. व्हॅटिकन सिटीनं यासंदर्भातील माहिती दिली. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. नुकतीच त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी.व्हॅन्स यांची भेट घेतली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते कॅथलिक चर्चचे प्रमुख होते. पोप फ्रान्सिस यांचं वेतन किती होतं माहित आहे का? त्यांनी आपल्या मागे किती संपत्ती सोडली आहे? त्याविषयी ही सविस्तर माहिती जाणून घेऊ.
किती होतं त्यांचं वेतन?
कॅथॉलिक चर्चचे प्रमुख असलेले पोप फ्रान्सिस यांनी कधीही वेतन घेतलं नाही. यापूर्वीच्या पोप यांच्या विपरीत त्यांनी २०१३ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर चर्चकडून कोणत्याही प्रकारचे वेतन स्वीकारण्यास नकार दिला होता. पोप यांना परंपरेने वेतन मिळतं. त्यांच्या या पदासाठी सध्याचं वेतन दरमहा ३२,००० डॉलर असल्याचं काही रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. पोप फ्रान्सिस यांनी मात्र ही रक्कम चर्चला दान करणं, फाऊंडेशनसाठी वापरणं, ट्रस्टमध्ये ठेवणं किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला देणं पसंत केलं.
पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
फ्रान्सिस यांची संपत्ती किती?
वेतन घेतलं नसलं तरीही पोप फ्रान्सिस यांच्याकडे आपल्या पदाशी संबंधित अनेक मालमत्ता आहेत. ज्या त्यांनी मागे सोडल्या आहेत. या मालमत्तेची अंदाजे किंमत सुमारे १६ मिलियन डॉलर्स आहे. या संपत्तीत पोप फ्रान्सिस यांच्या मालकीच्या पाच कार आणि त्यांच्या भूमिकेशी संबंधित इतर लाभांचा समावेश आहे. त्यांनी आपला हक्काचा पगार घेतला नसला तरी त्यांच्या पगाराची रक्कम त्यांच्या एकूण मालमत्तेत अजूनही योगदान देते.
पोप फ्रान्सिस यांचा कार्यकाळ
पोप फ्रान्सिस यांचं मूळ नाव जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ असं होतं. त्यांचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला होता. पोप फ्रान्सिस हे २०१३ मध्ये पोप बेनेडिक्ट XVI यांच्या राजीनाम्यानंतर इतिहासातील पहिला लॅटिन अमेरिकन पोप ठरले. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात, त्यांना त्यांच्या जेसुइट मूल्यांसह साध्या जीवनशैलीच्या बांधिलकीसाठी ओळखलं गेलं. पोप होण्यापूर्वीदेखील त्यांनी चर्चकडून पैसे स्वीकारले नव्हते, असं व्हॅटिकननं २००१ मध्ये स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे, चर्चची जगभरात अनेक महत्त्वपूर्ण मालमत्ता आहे, जी चर्चची आर्थिक ताकद मजबूत करण्याचं काम करते.