Charlie Javice : जगभरात अनेक आर्थिक घोटाळे गाजले. भारतातही बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून उद्योगपती दुसऱ्या देशात पळाले. मात्र, एका २८ वर्षीय तरुणीने जगातील सर्वात मोठ्या बँकेला कसा गंडा घातला हे वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. या तरुणीने जगातील सर्वात बलाढ्य मानल्या जाणाऱ्या 'जेपी मॉर्गन चेस' बँकेला तब्बल १७५ दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे १४०० कोटी रुपये) चुना लावला. चार्ली जेविस या तरुणीची ही कथा कोणत्याही थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही.
व्हार्टनची पदवी आणि 'फ्रँक'चा जन्म
न्यूयॉर्कमधील एका श्रीमंत कुटुंबात वाढलेल्या चार्लीकडे शिक्षणाची आणि पैशांची कमतरता नव्हती. जगातील सर्वोत्तम बिझनेस स्कूल 'व्हार्टन'मधून पदवी घेतल्यानंतर तिने 'फ्रँक' नावाचा स्टार्टअप सुरू केला. हा स्टार्टअप विद्यार्थ्यांना कॉलेज फीसाठी सरकारी मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सोपी करतो, असा तिचा दावा होता. एका 'दानशूर'च्या रूपात तिने स्वतःला सादर केले आणि अल्पावधीतच ती 'फोर्ब्स ३० अंडर ३०' या प्रतिष्ठित यादीत झळकली.
१४०० कोटींची 'सोन्याची खाण'
२०२१ मध्ये जेपी मॉर्गन बँकेला तरुणांशी जोडले जाणारे नवे व्यासपीठ हवे होते. चार्लीने ही संधी साधली. तिने बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर दावा केला की, तिच्या 'फ्रँक' स्टार्टअपकडे ४२ लाख युजर्स (विद्यार्थी) आहेत. बँकेला वाटले की, या ४२ लाख ग्राहकांना आपण भविष्यात कर्ज आणि क्रेडिट कार्ड विकू शकतो. विश्वासाच्या जोरावर जेपी मॉर्गनने १७५ दशलक्ष डॉलर्स मोजून हा स्टार्टअप खरेदी केला.
४२ लाखांचे आकडे आणि एका 'प्रोफेसर'ची एन्ट्री
बँकेने जेव्हा पुराव्यासाठी ग्राहकांची यादी मागितली, तेव्हा चार्लीचे धाबे दणाणले. तिच्याकडे प्रत्यक्षात फक्त ३ लाख ग्राहक होते. ३९ लाख ग्राहकांचा आकडा कुठून आणायचा? चार्लीने एका डेटा सायन्सच्या प्रोफेसरला मोठी लाच देऊन कॉम्प्युटर प्रोग्रामद्वारे ३९ लाख बनावट नावे, ईमेल आणि जन्मतारीख तयार करून घेतल्या. जेपी मॉर्गनसारख्या दिग्गज संस्थेचे तपासनीस तिच्या आत्मविश्वासापुढे झुकले आणि हा बनावट डेटा खरा मानला.
४ लाख ईमेल अन् १ टक्का रिझल्ट!
खरेदी झाल्यानंतर काही महिन्यांनी सत्य बाहेर आले. बँकेच्या मार्केटिंग टीमने त्या ४२ लाख विद्यार्थ्यांना ईमेल पाठवले. ४ लाख ईमेल पाठवूनही त्यातील फक्त १% लोकांनी ते उघडले. ९०% पेक्षा जास्त ईमेल हे अस्तित्वातच नसलेल्या बनावट पत्त्यांवर पाठवले गेले होते. बँकेच्या पायाखालची जमीन सरकली. खोलवर चौकशी केल्यावर कळाले की, चार्लीने दिलेला सर्व डेटा हा 'फेब्रिकेटेड' म्हणजेच पूर्णपणे बनावट होता.
वाचा - टाटा पॉवरचा मोठा धमाका! मेगा प्रोजेक्टमुळे चीनची मक्तेदारी संपणार; हजारो हातांना मिळणार काम
कोर्टाची पायरी आणि स्टार्टअप जगाला धडा
जेपी मॉर्गनने तातडीने चार्लीला नोकरीवरून काढून टाकले आणि तिच्यावर फसवणुकीचा खटला भरला. सध्या चार्ली जेविस कायदेशीर लढाईत अडकली असून, दोषी आढळल्यास तिला अनेक वर्षे तुरुंगवासाची सजा होऊ शकते. या प्रकरणामुळे स्टार्टअप विश्वातील 'आकड्यांच्या खेळा'वर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ मोठे 'व्हॅल्युएशन' मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना खोटे आकडे दाखवणे किती महागात पडू शकते, याचे हे जागतिक उदाहरण ठरले आहे.
