Hindenburg Research Shut Down : हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नेट अँडरसननं कंपनी बंद करण्याची घोषणा केली. हिंडेनबर्गने आपल्या शॉर्ट-सेलिंग आणि रिपोर्टद्वारे उद्योग जगताचं लक्ष वेधून घेतलं. यामुळे भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाचे अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झालं होतं. आता प्रश्न असाय की अँडरसननं हिंडेनबर्ग बंद करण्याचा निर्णय का घेतला?
कंपनी बंद करण्याच्या अँडरसनच्या निर्णयाबाबत अँडरसननं, हिंडेनबर्ग बंद करण्याचा निर्णय हा अत्यंत वैयक्तिक असल्याचं सांगितलं. "कोणतीही विशिष्ट गोष्ट नाही. कोणतीही विशेष जोखीम नाही, आरोग्याच्या समस्याही नाहीत आणि कोणतीही मोठी वैयक्तिक समस्या नाही," असं अँडरसननं म्हटलं. सुरुवातीला मला काही गोष्टी सिद्ध करण्याची गरज असल्याचं वाटलं. परंतु आता मला काही प्रमाणात आराम मिळालाय आणि कदाचित हे पहिल्यांदाच झालंय, असंही त्यानं म्हटलं.
आम्ही आमच्या कामानं काही साम्राज्य हलवलं
हिंडेनबर्ग रिसर्च सुरू करताना आम्ही सर्वांनी अचूकतेवर लक्ष केंद्रित करत पुराव्यांवर आधारित भाष्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. कधीकधी याचा अर्थ असा होतो की मोठे संकट ओढावून घेण्यासारखे होते. आमची लढाई आमच्यापेक्षा कितीतरी मोठ्या व्यक्तींशी होती. फसवणूक, भ्रष्टाचार आणि नकारात्मकता अनेकदा जबरदस्त वाटते. सुरुवातीला न्यायाची भावना सहसा अशक्य होती, परंतु जेव्हा ती घडली तेव्हा ती अत्यंत समाधानकारक होती. शेवटी, आम्ही आमच्या कामाचा प्रभाव पाडला. मी सुरुवातीला विचार केला होता त्यापेक्षा खूपच जास्त. आमच्या कामाच्या माध्यमातून नियामकांनी जवळजवळ १०० व्यक्तींना दिवाणी किंवा फौजदारी खटल्यात आणलं आहे. आम्ही काही साम्राज्यांना हादरवून टाकले ज्यांना हादरवून टाकण्याची गरज होती, ज्यात अब्जाधीशांचा समावेश होता असंही अँडरसननं म्हटलं.
A Personal Note From Our Founderhttps://t.co/OOMtimC0gV
— Hindenburg Research (@HindenburgRes) January 15, 2025
अदानी समूह, सेबीवर केलेले आरोप
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने जानेवारी २०२३ मध्ये अदानी समूहावर कॉर्पोरेट गैरव्यवहार आणि शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप केला होता. हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे भारतीय उद्योग जगतात खळबळ माजली होती. गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. याशिवाय हिंडेनबर्गनं सेबीवरही आरोप केले होते.