Harsh Goenka on Work-Life Balance : लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यन यांनी आठवड्यातून ९० तास काम करण्याच्या दिलेल्या सूचनेवरून वाद सुरूचे आहे. हर्ष मारीवाला, हर्ष गोयंका आणि राजीव बजाज यांसारख्या उद्योग जगातील दिग्गजांनी यावर आपलं मत व्यक्त करत यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करणे हे कामाच्या तासांवर अवलंबून नसल्याचे म्हटलं. जास्त तास काम करण्याच्या नियमाचे पालन करायचे असेल तर ते वरच्या स्तरापासून सुरू करावे असं अनेकांनी सुचवलं. अशातच आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी भारताला डेन्मार्कच्या काम करण्याच्या पद्धतीपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले आहे.
एल अँड टीचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यन यांनी केलेल्या विधानांमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर व्यवसाय क्षेत्रापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या व्यक्तींनी टीका केली आहे. आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी काम स्मार्ट पद्धतीने केले पाहिजे गुलामगिरीसारखे नाही, असं म्हणत निशाणा साधला होता. याच चर्चेला पुढे नेत त्यांनी गोयंका यांनी भारतात डेन्मार्क मॉडेल राबवण्याचा सल्ला दिला आहे. डेन्मार्कमधील कर्मचारी हे स्वतंत्रपणे कोणतेही मोठं नियोजन नसतानाही उत्तम काम करत असल्याचे हर्ष गोयंका यांनी म्हटलं आहे.
"डेन्मार्कमध्ये, कर्मचाऱ्यांना सूक्ष्म व्यवस्थापनाशिवाय स्वतंत्रपणे काम करण्याचा विश्वास दिला जातो. त्यांना दरवर्षी किमान पाच आठवडे सुट्टी आणि सहा महिने पालकत्वाची रजा मिळते. लवचिक कामाचे तास लोकांना त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन संतुलित करण्यास मदत करतात. तसेच नोकरी गमावल्यास तिथले सरकार काही मदतही देऊ करते," असं गोयंका यांनी म्हटलं.
डेन्मार्कमध्ये कर्मचाऱ्यांना सशक्त बनवणाऱ्या कठोर कामाची साचेबद्ध प्रणाली नसल्याचेही गोयंका म्हणाले. बरेच डॅनिश लोक लॉटरी जिंकले तरीही काम करतील, अशी तिथली वृत्ती असल्याचे हर्ष गोयंका यांनी म्हटलं. डेन्मार्कमधील कंपन्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा सामूहिक कल्याणाला प्राधान्य देऊन मानसिक आरोग्याला महत्त्व देतात आणि भारताने याच्यातून धडे घेण्यासारखं आहे, असा निष्कर्ष गोयंका यांनी काढला.
Why the people in Denmark are happiest about their work practices:
— Harsh Goenka (@hvgoenka) January 16, 2025
- Employees are trusted to work independently without micromanagement
- Minimum five weeks of vacation and six months of parental leave
- Flexible hours allow time for family and personal life
- Job loss is…
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एल अँण्ड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांकडून ९० तासांची अपेक्षा केल्यानंतर वाद सुरु झाला होता. एका संवादादरम्यान, तुम्ही घरी बसून काय करता? किती वेळ बायकोकडे टक लावून बघू शकता? बायका नवऱ्याकडे किती वेळ टक लावून बघू शकतात? तुम्ही ऑफिसला जा आणि तुमचं काम करायला लागा. खरे सांगायचे तर, रविवारी मी तुम्हाला काम करायला लावू शकत नाही याचे मला वाईट वाटते. जर मी तुम्हाला रविवारी देखील कामावर आणू शकलो तर मला खूप आनंद होईल, कारण मी स्वतः देखील रविवारी काम करतो", असं एसएन सुब्रमण्यन म्हणाले होते.