चेन्नई : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुधारणा देशातील प्रत्येक नागरिकाचा मोठा विजय आहे. भारतातील प्रत्येक राज्यातील सण लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी जीएसटी सुधारणा लागू करण्याच्या सूचना देण्याच्या खूप आधी जीएसटी सुधारणा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटीचा लाभ सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सर्व उत्पादनांवर मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली.
चेन्नई येथे आयोजित ‘टॅक्स रिफॉर्म्स फॉर इमर्जिंग इंडिया’ कार्यक्रमात आपल्या भाषणात सीतारामण म्हणाल्या की, जीएसटीअंतर्गत पूर्वी १२ टक्के कर आकारला जाणाऱ्या ९९ टक्के वस्तूंवर आता फक्त पाच टक्के कर आकारला जाईल. नवीन जीएसटी सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू होतील.
३५० हून अधिक वस्तूंवरील कर कमी
जीएसटी परिषदेने ३५० हून अधिक वस्तूंवरील करदर कमी केले असून, केंद्र सरकारने विविध स्लॅबच्या ऐवजी फक्त पाच आणि १८ टक्के स्लॅब लागू केले आहेत. आता कोणत्याही उत्पादनावर २८ टक्के जीएसटी नाही. तसेच व्यापाऱ्यांसाठी प्रक्रियाही सोपी केली आहे.
३.५० लाख कोटी रुपयांनी मागणी वाढेल
सरकारने केलेल्या जीएसटी दरकपातीमुळे आणि आयकरातील सूट दिल्यामुळे अर्थव्यवस्थेत एकूण मागणी ३.५ लाख कोटी रुपयांनी वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे देशाच्या आर्थिक वाढीची क्षमता ७.० ते ७.५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
करकपातीने लोकांच्या हातात उत्पन्न येईल. यामुळे २.३ लाख कोटी रुपयांची मागणी वाढेल. जीएसटी दरकपातीमुळे आणखी १.२ लाख कोटी रुपयांची वाढ होईल. यामुळे एकूण मागणीत ३.५ लाख कोटींची मागणी वाढेल.
सुजान हाजरा, अर्थतज्ज्ञ