जीवन आणि आरोग्य विमा परवडणारा, उपचार स्वस्त- जीवन विमा, आरोग्य विमा पॉलिसीच्या प्रीमियमवर लावला जाणारा १८ टक्के जीएसटी पूर्णपणे हटविण्यात आला आहे. यामुळे व्यक्तिगत जीवन विमा किंवा आरोग्य विमा पॉलिसीधारकांना या सूटमुळे प्रीमियमवर थेट १८ टक्क्यांची बचत होणार आहे.
शेतकऱ्यांना सौरपंपांवर १,७५० कोटींचा दिलासा - पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत ३ किलोवॅटच्या प्रणालीवर ९,००० ते १०,५०० रुपयांची बचत होणार आहे. पीएम-कुसूम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १० लाख सौर पंपांवर १,७५० कोटींचा दिलासा मिळणार. आतापर्यंत २० लाख घरांना सौरऊर्जा योजनेचा लाभ मिळाला आहे.
वह्या स्वस्त न होता उलट महागण्याची शक्यता - देशातील वह्या तयार करणाऱ्या उद्योगांनी केंद्र सरकारला नव्या जीएसटी दरांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. दरकपातीमुळे निर्माण झालेल्या शुल्क रचनेमुळे उत्पादन खर्च वाढणार असून, ग्राहकांपर्यंत लाभ पोहोचणार नाही, असा त्यांचा दावा आहे.
शाळेच्या बॅग महागच, व्यापाऱ्यांमध्ये नाराजी - शाळेच्या बॅगवर जीएसटी दर १८ टक्क्यांवरच कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. ५०० रुपयांची साधी शाळेची बॅग आणि विमानतळावर मिळणारी ५,००० रुपयांची लक्झरी बॅग या दोन्हींवर १८ टक्के जीएसटी आहे. हे तर्कसंगत वाटत नाही, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
व्यापाऱ्यांनी जीएसटी दरकपातीचे स्वागत करताना म्हटले की यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठी दिलासा मिळेल. मात्र काही व्यापार संघटनांनी रिफंड आणि अंमलबजावणीबाबत चिंता व्यक्त केली आहे. जर एखाद्या वस्तूवर आधी १८ टक्के कर भरला असेल आणि आता तो ५ टक्के झाला, तर व्यापाऱ्यांना १३% रिफंड थेट मिळणार नाही. ही रक्कम समायोजित केली जाईल, ज्यामुळे भांडवलावर परिणाम होईल, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
किराणा खर्चात १३% बचत - किराणा आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या खर्चात सुमारे १३ टक्क्यांची बचत होणार आहे. तर छोटी कार खरेदी करणाऱ्याला जवळपास ७० हजार रुपयांचा फायदा होणार आहे. स्टेशनरी, कपडे, बूट, औषधांच्या खरेदीवर ७ ते १२ टक्क्यांची बचत होईल.
नव्या जीएसटीमुळे देशांतर्गत उत्पादन वाढेल, एमएसएमईसाठी अनुपालन सुलभ होईल व भारतीय उत्पादनांच्या स्पर्धात्मकतेत वाढ होईल. - हर्षवर्धन अग्रवाल, अध्यक्ष, फिक्की
करकपात घरगुती उत्पन्न वाढवून स्वदेशी उत्पादन व मागणीला चालना देईल. त्यामुळे भारत ‘स्वावलंबी’ आणि ‘विकसित भारत’ च्या दिशेने वेगाने वाटचाल करील. - चंद्रजीत बॅनर्जी, महासंचालक, सीआयआय
सेवा | जीएसटी कपात | जुनी किंमत | नवी किंमत |
---|---|---|---|
चित्रपटाचे तिकीट | १२% → ५% | ₹१०० | ₹८४ |
हॉटेलची खोली (७५००₹ पर्यंत) | १२% → ५% | ₹७५०० | ₹७००० |
वस्तू | जीएसटी कपात | जुनी किंमत | नवी किंमत |
---|---|---|---|
तूप (१ लिटर) | १२% → ५% | ₹६७५ | ₹६४५ |
रवा + मैदा (१ किलो) | ५% → ०% | ₹६० | ₹५७ |
बेसन (१ किलो) | ५% → ०% | ₹११० | ₹१०५ |
साखर (१ किलो) | ५% → ०% | ₹५० | ₹४७ |
मीठ (१ किलो) | ५% → ०% | ₹२७ | ₹२५.५ |
वस्तू | जीएसटी कपात | जुनी किंमत | नवी किंमत |
---|---|---|---|
दूध पावडर (१ किलो) | १२% → ५% | ₹४७५ | ₹४४२ |
बल्ब (१२ वॅट) | १२% → ५% | ₹८० | ₹७४ |
पंखा | १८% → ५% | ₹१५०० | ₹१३१० |
वस्तू | जीएसटी कपात | जुनी किंमत | नवी किंमत |
---|---|---|---|
प्रेशर कुकर (३ लि.) | १२% → ५% | ₹७०० | ₹६५० |
मिक्सर ग्राइंडर | १८% → ५% | ₹५५०० | ₹४८०० |
वॉशिंग पावडर | १८% → ५% | ₹१५० | ₹१३५ |
सॅनटरी नॅपकीन | १२% → ०% | ₹२५० | ₹२२३ |
झाडू | ५% → ०% | ₹१२० | ₹११४ |