Gross GST Collection : भारत सरकारने वस्तू आणि सेवा कर दरात कपात करूनही, देशातील एकूण जीएसटी संकलनामध्ये वाढ नोंदवली गेली आहे. १ डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये देशाचे एकूण जीएसटी कलेक्शन १.७० लाख कोटी इतके झाले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२४ मध्ये हे कलेक्शन १.६९ लाख कोटींपेक्षा जास्त होते. याचा अर्थ, यामध्ये ०.७% ची किरकोळ वाढ झाली आहे. या तुलनेत, ऑक्टोबर २०२५ मध्ये ग्रॉस जीएसटी कलेक्शन वार्षिक आधारावर ४.६% वाढून १.९६ लाख कोटींवर पोहोचले होते.
दर कपातीनंतर महसुलात किरकोळ घट
नोव्हेंबर २०२५ मध्ये देशांतर्गत महसूल २.३% नी घसरून १.२४ लाख कोटी रुपयांवर आला आहे. जीएसटी दरात कपात केल्यानंतर ही घट झाली आहे. मात्र, वस्तूंच्या आयातीतून मिळणाऱ्या महसुलात १०.२% वाढ झाली असून तो ४५,९७६ कोटी रुपये इतका नोंदवला गेला आहे.
GST २.०: 'नव्या दरां'मुळे काय बदल झाला?
स्वयंपाकघरातील वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाइलसह ३७५ वस्तूंवर जीएसटीचे नवे दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू झाले आहेत. 'जीएसटी २.०' अंतर्गत आता फक्त ५% आणि १८% हे दोनच दर स्लॅब अस्तित्वात आहेत. १२% आणि २८% चे स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. (सिन गुड्स आणि लक्झरी वस्तूंसाठी ४०% चा विशेष दर कायम आहे.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात दिवाळीपूर्वी जीएसटी दरात कपात करण्याची घोषणा केली होती.
तंबाखू, पान मसालावर लागणार नवा 'सेस'
जीएसटी कंपन्सेशन सेस संपुष्टात आल्यानंतरही तंबाखू उत्पादनांवर कराचा भार कायम राखण्यासाठी सरकारने आज (सोमवार) लोकसभेत दोन महत्त्वपूर्ण विधेयक सादर केले आहेत. कंपन्सेशन सेसच्या जागी आता नवीन उपकर लावला जाईल:
'केंद्रीय उत्पादन शुल्क (दुरुस्ती) विधेयक, २०२५' नुसार सिगारेटसह विविध तंबाखू उत्पादनांवर उत्पादन शुल्क लावले जाईल, जे तंबाखूवरील जीएसटी कंपन्सेशन सेसची जागा घेईल. 'आरोग्य सुरक्षा ते राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक, २०२५' हे पान मसालावर लावण्यात येणाऱ्या कंपन्सेशन सेसची जागा घेईल.
या दोन्ही उपकरांचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित खर्चांसाठी अतिरिक्त निधी उभा करणे आहे. या उपकरांतर्गत पान मसाला बनवणाऱ्या मशीन्सवर किंवा प्रक्रियांवरही सेस लावला जाईल. सध्या तंबाखू आणि पान मसालावर २८% जीएसटीसह वेगवेगळे कंपन्सेशन सेस लागू आहेत.
