GST Collection In December: केंद्र सरकारने डिसेंबर 2025 मधील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. या कालावधीत जीएसटी महसूल वार्षिक आधारावर 6 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गुरुवारी, 1 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1.74 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
याआधी डिसेंबर 2024 मध्ये देशाचा एकूण GST महसूल 1.64 लाख कोटी रुपयांहून अधिक होता. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात सरकारच्या तिजोरीत लक्षणीय भर पडल्याचे चित्र आहे.
GST संकलनात 6.1 टक्क्यांची वाढ
भारत सरकार कडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये जीएसटी संकलनात 6.1 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आली. मोठ्या प्रमाणात GST दरकपात करण्यात आली असतानाही हा आकडा समाधानकारक असल्याचे मानले जात आहे.
देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा महसूल 1.2 टक्क्यांनी वाढून 1.22 लाख कोटी रुपये झाला. तर, आयातीत वस्तूंमधून मिळणारा महसूल तब्बल 19.7 टक्क्यांनी वाढून 51,977 कोटी रुपये झाला. तसेच, GST रिफंड 31 टक्क्यांनी वाढून 28,980 कोटी रुपये इतका झाला.
नेट GST महसूल 1.45 लाख कोटींवर
रिफंड समायोजित केल्यानंतरचा नेट GST महसूल डिसेंबर 2025 मध्ये 1.45 लाख कोटी रुपये इतका राहिला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 2.2 टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान, सेस संकलनात घट दिसून आली आहे. डिसेंबर 2025 मध्ये सेस कलेक्शन 4,238 कोटी रुपये इतके राहिले, तर डिसेंबर 2024 मध्ये ते 12,003 कोटी रुपये होते.
GST दरकपातीचा महसुलावर परिणाम
अहवालानुसार, 22 सप्टेंबर 2025 पासून सुमारे 375 वस्तूंवरील GST दर कमी करण्यात आले होते. यामुळे दैनंदिन वापरातील जवळपास 99 टक्के वस्तू स्वस्त झाल्या. तसेच, कंपेन्सेशन सेस आता केवळ तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांपुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे. याआधी हा सेस लक्झरी आणि ‘सिन प्रॉडक्ट्स’वरही लागू होता. तज्ज्ञांच्या मते, GST दरकपातीमुळे महसूल संकलनावर काही प्रमाणात परिणाम झाला असला, तरीही आयातीतून वाढलेले उत्पन्न आणि स्थिर देशांतर्गत व्यवहार यामुळे एकूण संकलन सकारात्मक राहिले आहे.
