Google Credit Card: लोकप्रिय UPI पेमेंट ॲप Google Pay ने Axis Bank सोबत मिळून RuPay नेटवर्कवर एक नवीन को-ब्रांडेड क्रेडिट कार्ड लाँच केलं आहे. हे कार्ड थेट युजर्सच्या UPI अकाऊंटशी जोडलं जाऊ शकतं, ज्यामुळे व्यापाऱ्यांना केले जाणारे पेमेंट UPI द्वारे क्रेडिटवर करणं शक्य होणार आहे.
या क्रेडिट कार्डचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रत्येक व्यवहारावर कॅशबॅक किंवा रिवॉर्ड त्वरित मिळणार आहेत. सामान्यतः क्रेडिट कार्ड्समध्ये रिवॉर्ड्स महिन्याच्या शेवटी किंवा बिलिंग सायकल पूर्ण झाल्यावर मिळतात. मात्र, Google चे सीनियर डायरेक्टर आणि प्रॉडक्ट मॅनेजर शरत बुलुसु यांच्या मते, युजर एका पेमेंटवर कमावलेला रिवॉर्ड त्याच्या पुढच्याच पेमेंटमध्ये वापरू शकतो.
RuPay-UPI मॉडेलची वाढती लोकप्रियता
RuPay आणि UPI या दोन्ही प्रणाली नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे चालवल्या जातात. RuPay-UPI मॉडेल वेगाने लोकप्रिय होत आहे कारण यामध्ये UPI ची सहज उपलब्धता आणि क्रेडिट कार्डची मर्यादा व रिवॉर्ड्स अशा दोन्ही गोष्टींचा फायदा मिळतो. विशेष म्हणजे, Mastercard आणि Visa कार्ड्स सध्या UPI शी लिंक करता येत नाहीत, ज्यामुळे RuPay ला या क्षेत्रात मोठी आघाडी मिळाली आहे.
वाढत्या स्पर्धेमध्ये Google Pay ची एंट्री
UPI शी संबंधित को-ब्रांडेड क्रेडिट कार्ड्सच्या बाजारपेठेत आधीच मोठी स्पर्धा आहे. PhonePe ने जूनमध्ये HDFC Bank सोबत RuPay क्रेडिट कार्ड लाँच केलं होतं आणि नंतर SBI Cards सोबत Visa व RuPay दोन्ही नेटवर्कवर कार्ड आणलं. Paytm ने २०१९ मध्ये Citi Bank आणि २०२१ मध्ये HDFC Bank सोबत आपले कार्ड लाँच केलं होतं, ज्यामध्ये नंतर SBI ला देखील जोडलं गेलं. याशिवाय Cred आणि super.money सारखे ॲप्स देखील UPI शी जोडलेले क्रेडिट कार्ड ऑफर करत आहेत.
Google Pay ची रणनीती आणि उद्दिष्ट
शरत बुलुसु यांनी स्पष्ट केलं की, Google Pay चा उद्देश केवळ बाजारात सर्वात आधी उतरणं हा नसून, युजर्ससाठी उत्पादन सोपं आणि भक्कम बनवणं हा आहे. भारतात पाचपैकी केवळ एका व्यक्तीलाच क्रेडिटची सुविधा मिळते. हा फरक भरून काढल्यास क्रेडिट मार्केटमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असं कंपनीचं मानणं आहे.
Google Pay च्या या क्रेडिट कार्डमध्ये वापरलेले पैसे परत करण्याबाबत विशेष सुविधा देण्यात आली आहे. युजर्स आपल्या महिन्याचे बिल ६ किंवा ९ महिन्यांच्या EMI मध्ये फेडू शकतात. परतफेडीतील लवचिकता आणि साधेपणा युजर्ससाठी अत्यंत आवश्यक आहे, हीच गरज लक्षात घेऊन हे फीचर तयार करण्यात आले आहे.
कॅशबॅक आणि रिवॉर्ड्सची रचना
सामान्यतः पेमेंट ॲप्स त्यांच्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर केलेल्या व्यवहारांवर ५ ते १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देतात. पार्टनर ॲप्स आणि वेबसाइट्सवर हे प्रमाण ३ ते ५ टक्के असते. इतर सर्व पेमेंट्स, ज्यामध्ये UPI द्वारे 'स्कॅन अँड पे' चा समावेश आहे, त्यावर सुमारे १ ते १.५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळतो. दरम्यान, Google Pay चे Axis Bank सोबत 'Ace' क्रेडिट कार्ड आधीच उपलब्ध आहे जे Visa नेटवर्कवर चालते, मात्र आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याला पूर्णपणे को-ब्रांडेड कार्डच्या श्रेणीत ठेवले जात नाही.
