पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ इंडियाच्या (BoI) ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर 2025 च्या सुरवातीलाच पीएनबी आणि बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जावरील व्याज दरात कपात केली आहे. या दोन्ही बँकांनी MCLR (मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट्स) मध्ये कपात केली आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळेल. महत्वाचे म्हणजे, दोन्ही बँकांसाठी सुधारित दर १ सप्टेंबर २०२५ पासून लागू असेल.
जाणून घ्या सविस्तर -
पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ इंडियाने (BoI) MCLR मध्ये बदल केला आहे. यामुळे एमसीएलआरशी संबंधित कर्जदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पीएनबीने आपल्या एमसीएलआरमध्ये १५ बेसिस पॉइंट्सपर्यंत कपात केली आहे. तर बँक ऑफ इंडियाने रात्रीचा कालावधी वगळता सर्व कालावधीसाठी ५ ते १५ बेसिस पॉइंट्सने दर कमी केले आहेत.
महत्वाचे म्हणजे, रिझर्व्ह बँकेने (RBI) ६ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या आपल्या चलनविषयक धोरण (MPC) बैठकीत रेपो दर ५.५% वर अपरिवर्तित ठेवला असतानाही, या दोन्ही बँकांनी सप्टेंबर २०२५ मध्ये आपले कर्ज दर कमी केले आहेत.