Super rich tax : लंडन शहराला जगातील सर्वात श्रीमंत लोकांचे निवासस्थान मानले जाते. अब्जाधीश येथे कोट्यवधी रुपये खर्च करतात. त्यांना येथील कायदे 'स्वर्गा'सारखे वाटत होते. मात्र, आता इंग्लंड सरकारच्या एका निर्णयाने या श्रीमंत वस्तीत खळबळ उडवून दिली आहे. कारण, यापुढे अतिश्रीमंत लोकांवर अतिरिक्त कर लादला जाणार आहे. भारतात देखील असा कर गोळा केला जातो. पण, त्याचे स्वरुप वेगळं आहे.
लंडनमध्ये 'नॉन-डोम' टॅक्स व्यवस्था बंद
इंग्लंडमध्ये नुकताच कर नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे 'सुपर-रिच' लोकांची झोप उडाली आहे. इंग्लंडमध्ये अनेक वर्षांपासून 'नॉन-डोम स्टेटस' नावाची कर व्यवस्था होती. यानुसार, जर तुम्ही खूप श्रीमंत असाल आणि तुमचे मूळ घर इंग्लंडबाहेर (उदा. भारत, रशिया किंवा अरब देश) असेल, पण तुम्ही लंडनमध्ये राहत असाल, तर तुम्हाला तुमच्या विदेशी उत्पन्नावर इंग्लंड सरकारला एक रुपयाही कर द्यावा लागत नव्हता. सरकारने एप्रिल २०२५ पासून ही व्यवस्था बंद केली आहे. आता या 'सुपर-रिच' लोकांना त्यांच्या जगभरातील कमाईवर इंग्लंडमध्ये कर भरावा लागेल. या निर्णयामुळे अनेक अब्जाधीशांनी यूके सोडण्याचा विचार सुरू केला असल्याचे मीडिया रिपोर्ट्स सांगतात.
भारतात 'वेल्थ टॅक्स' नाही, लागतो 'सरचार्ज'
तुमच्या मनात प्रश्न येत असेल की भारतात श्रीमंतांवर कोणताही अतिरिक्त कर लागतो का? तर, याचे उत्तर आहे 'होय', पण त्याची पद्धत वेगळी आहे. भारतात २०१५ पर्यंत 'वेल्थ टॅक्स' (संपत्ती कर) लागू होता, जो श्रीमंतांच्या मालमत्तेवर (गाडी, दागिने, बंगला) लागायचा. पण यातून कमाई कमी आणि वसुलीची डोकेदुखी जास्त होती, म्हणून तो बंद करण्यात आला. वेल्थ टॅक्सऐवजी भारताने 'सरचार्ज'चा मार्ग स्वीकारला, याला तुम्ही 'श्रीमंत टॅक्स' म्हणू शकता.
- ₹५० लाख ते ₹१ कोटी वार्षिक उत्पन्न : टॅक्सवर १०% सरचार्ज.
- ₹१ कोटी ते ₹२ कोटी वार्षिक उत्पन्न : टॅक्सवर १५% सरचार्ज.
- ₹२ कोटींहून अधिक उत्पन्न : टॅक्सवर २५% इतका मोठा सरचार्ज भरावा लागतो. (पूर्वी हा दर ३७% होता, जो कमी करण्यात आला.)
जगातील इतर देशांत 'श्रीमंती कर' कसा आहे?
- नॉर्वे : हा देश खूप कडक आहे. जर एखाद्या व्यक्तीची नेटवर्थ एका मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर त्याला दरवर्षी आपल्या संपत्तीचा जवळपास १% ते १.१% कर सरकारला द्यावा लागतो. यामुळेच अनेक नॉर्वेजियन अब्जाधीश देश सोडून स्वित्झर्लंडला गेले आहेत.
- स्पेन : स्पेनने 'सॉलिडॅरिटी टॅक्स' नावाचा नवीन नियम आणला आहे. ज्यांची संपत्ती ३ दशलक्ष युरो (सुमारे ₹२७ कोटी) पेक्षा जास्त आहे, त्यांना हा कर लागू होतो.
- फ्रान्स : फ्रान्सने श्रीमंतांवर टॅक्स लावण्याचा एक अनोखा मार्ग निवडला आहे. तिथे IFI नावाचा कर आहे, जो फक्त रिअल इस्टेटवर लागतो. त्यांनी व्यवसाय थांबू नये म्हणून शेअर्स आणि गुंतवणुकीला यातून वगळले आहे.
वाचा - तेजस फायटर जेट क्रॅशचा मोठा फटका! HAL च्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची मोठी घसरण; अजून पडणार?
- स्वित्झर्लंड : याला श्रीमंतांचे स्वर्ग म्हटले जाते, तिथेही वेल्थ टॅक्स लागतो, पण त्याचे दर खूप कमी (०.१% ते १% पर्यंत) आहेत आणि प्रत्येक राज्याचे नियम वेगळे आहेत.
