Gensole Share Price: शेअर बाजारातील घसरणीमुळे अनेक कंपन्यांचे समभाग कोसळले आहेत. त्याचबरोबर असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गेल्या महिन्याभरात गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलंय. यातील एक शेअर म्हणजे जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडचा (Gensol Engineering Ltd) आहे. गेल्या १५ दिवसांत या कंपनीच्या शेअरमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घसरण झालीये. अशा तऱ्हेनं १५ दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे निम्म्याहून अधिक बुडाले आहेत.
जेनसोल ही इंजिनीअरिंग कंपनी ब्लूस्मार्टची मूळ कंपनी आहे. ब्लूस्मार्ट ही ईव्ही कार चालवणारी कॅब कंपनी आहे. ही कॅब कंपनी विमानतळावरून पिक अँड ड्रॉपची सुविधा देते. कॅब सेगमेंटमध्ये ब्लूस्मार्ट ही अतिशय स्मार्ट कॅब सेवा मानली जाते. जेनसोलचा शेअर आता घसरत असल्यानं ब्लूस्मार्ट कंपनीही चर्चेत आली आहे. उबर याचं अधिग्रहण करू शकतं, असं मानलं जात आहे.
किती झाली घसरण?
गेल्या आठवड्यात शुक्रवारी कंपनीच्या शेअरनं पाच टक्क्यांचा नीचांकी स्तर गाठला होता. या घसरणीमुळे हा शेअर २६१.७० रुपयांवर बंद झाला. गेल्या अनेक ट्रेडिंग सेशन्सपासून त्याला लोअर सर्किट लागत आहे. २८ फेब्रुवारी रोजी हा शेअर सुमारे ५३८ रुपयांवर बंद झाला. अशा तऱ्हेनं त्यात आतापर्यंत सुमारे ५१ टक्क्यांची घसरण झालीये. ज्या गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली आहे, त्यांनी मार्चमध्ये आतापर्यंत निम्म्याहून अधिक गुंतवणूक गमावली आहे. त्यात आणखी कधी गती येईल, हे सध्या सांगता येणार नाही.
का होतेय घसरण?
अलीकडेच दोन प्रमुख क्रेडिट रेटिंग एजन्सींनी (केअर रेटिंग्स आणि इक्रा केअर रेटिंग्स) कंपनीचे रेटिंग 'डी' केलं आहे. येथे 'डी' रेटिंग म्हणजे डिफॉल्ट स्टेटस. म्हणजेच, कंपनी एकतर डिफॉल्ट करू शकते किंवा आधीच आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. जेनसोल इंजिनीअरिंग कर्ज देण्यास उशीर करत असल्याचं कारण यामागे देण्यात आलंय. या रेटिंगमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला असून, त्यामुळे शेअरमध्ये मोठी विक्री होत आहे.
लिस्टिंग नंतर झाली होती चर्चा
जेनसोलचा आयपीओ १५ ऑक्टोबर २०१९ रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला होता. लिस्टिंग नंतर त्याला बरीच गती मिळाली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या शेअरने १३०० रुपयांचा टप्पा ओलांडला होता. पण त्यानंतर त्यात घट झाली. हा शेअर सध्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)