Gautam Adani: अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या Adani Global Indology Conclave मध्ये उद्योगपती गौतम अदानी यांनी भारतीय ज्ञानाला जागतिक स्तरावर संगठित, संरक्षित आणि आधुनिक रुपात सादर करण्यासाठी भव्य उपक्रमाची घोषणा केली. त्यांनी ‘भारत नॉलेज ग्राफ’ विकसित करण्यासाठी 100 कोटी रुपयांचे योगदान देणार असल्याचेही सांगितले.
हा उपक्रम अदानी समूह आणि शिक्षण मंत्रालयाच्या Indian Knowledge Systems च्या संयुक्त विद्यमाने झाला. अदानी यांनी ही देणगी भारताच्या महान सभ्यतेबद्दलचा ऋणभाव म्हणून दिली असल्याचे सांगितले. या प्रकल्पांतर्गत भारताने खगोलशास्त्र, गणित, तत्त्वज्ञान, भाषाविज्ञान, शासन, आरोग्य आणि पारंपरिक अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांत दिलेले ऐतिहासिक योगदान कृत्रिम बुद्धिमत्तेला अनुकूल अशा आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर संकलित केले जाणार आहे.
परिषदेत उपस्थित विद्वान, तांत्रिक तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि आध्यात्मिक नेत्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अदानींच्या या घोषणेचे भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल असे वर्णन केले. डिजिटल जगात सांस्कृतिक वारशाचे संरक्षण न झाल्यास भावी पिढ्या मशीनच्या निर्जीव तर्कशक्तीकडे झुकू शकतात, असा इशाराही अदानी यांनी दिला. त्यामुळे भारताची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंडोलॉजी मिशनअंतर्गत अदानी समूह आणि IKS यांनी IIT, IIM आणि देशातील प्रमुख विद्यापीठांमधील 14 पीएचडी संशोधकांना पाच वर्षांसाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. पाणिनीय व्याकरण, संगणनात्मक भाषाविज्ञान, प्राचीन खगोलशास्त्र, स्वदेशी आरोग्यपद्धती, शाश्वतता तत्त्वे आणि शास्त्रीय साहित्य यांसारख्या विषयांवर हे संशोधन आधारित असेल. या उपक्रमाचा व्यापक उद्देश भारतीय ज्ञानसंपदेचे डेटा सायन्स, सिस्टम थिंकिंग आणि मल्टीमॉडल आर्काइविंगच्या साहाय्याने नव्या पिढीसाठी अधिक सुलभ, विश्वसनीय आणि संशोधनाभिमुख स्वरूपात पुनर्निर्माण करणे हा आहे.
